गडचिरोली ते ऑस्ट्रेलिया : लॉयड्स मेटल्सच्या ऐतिहासिक उपक्रमातून २४ विद्यार्थ्यांना जागतिक शिक्षण
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०८ : गडचिरोलीसारख्या दुर्गम व दीर्घकाळ आव्हानांनी ग्रस्त भागातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी जागतिक शिक्षणाचे दालन खुले करत लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (LMEL) ने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. कंपनीच्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (CSR) उपक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील २४ विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियातील पर्थ येथील नामांकित कर्टिन विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी पूर्ण प्रायोजन देण्यात आले आहे.
सुरजागड लोहखनिज खाणींचे पूर्ण क्षमतेने कामकाज सुरू झाल्यानंतर, व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरण यांच्या नेतृत्वाखाली LMEL ने औद्योगिक प्रगतीला सामाजिक विकासाची दिशा दिली आहे. स्थानिक युवकांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देऊन दीर्घकालीन सामाजिक परिवर्तन घडवण्याचा हा उपक्रम मानला जात आहे.
४ मार्च २०२४ रोजी ‘अॅडव्हान्टेज विदर्भ’च्या समारोप समारंभात ग्रामीण महाराष्ट्राला जागतिक शैक्षणिक प्रवाहाशी जोडण्याचे दिलेले आश्वासन प्रत्यक्षात उतरवण्यात LMEL यशस्वी ठरले आहे. माध्यमांशी बोलताना श्री. प्रभाकरण यांनी सांगितले की, हा कार्यक्रम गडचिरोलीतील जनतेप्रती असलेल्या सामाजिक बांधिलकीचे प्रतीक असून, दीर्घकाळ उग्रवादाने प्रभावित राहिलेल्या या भागासाठी शाश्वत भविष्य घडवण्याचा प्रयत्न आहे.
सध्या बॅच १ व २ मधील १० विद्यार्थी कर्टिन विद्यापीठात अभियांत्रिकी व व्यवस्थापन विषयांचे शिक्षण घेत आहेत, तर आणखी १४ विद्यार्थ्यांना व्हिसा मंजूर झाला असून ते लवकरच आपले अभ्यासक्रम सुरू करणार आहेत. पदवी पूर्ण केल्यानंतर या विद्यार्थ्यांना LMEL मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पदांवर काम करण्याची संधी देण्यात येणार असून, पुढे कर्मचारी शेअर मालकी योजना (ESOP) साठीही ते पात्र ठरणार आहेत.
या उपक्रमांतर्गत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि बी. प्रभाकरण यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बोर्डिंग पास प्रदान करण्यात आले. यावेळी गडकरी यांनी या उपक्रमाचे कौतुक करत, भविष्यात गडचिरोलीमध्येही आंतरराष्ट्रीय दर्जाची विद्यापीठे उभी राहतील, असा विश्वास व्यक्त केला.
लॉयड्स–कर्टिन पूर्णतः प्रायोजित शैक्षणिक कार्यक्रम अंतर्गत LMEL कडून १०० टक्के शिक्षण शुल्क, निवास व्यवस्था, राहणीमान खर्च, प्रवास व प्रशासकीय खर्च वहन केला जात आहे. कंपनी दरवर्षी प्रति विद्यार्थ्यांमागे सुमारे ५० लाख रुपये खर्च करत असून, एकूण प्रति विद्यार्थी गुंतवणूक १.५ ते २ कोटी रुपयांपर्यंत आहे.
लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनमार्फत राबविण्यात येणारा हा उपक्रम तळागाळातील गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना भविष्यातील नेतृत्वासाठी सक्षम बनवण्यावर केंद्रित आहे. संसाधनांपुरते न थांबता माणसांमध्ये गुंतवणूक करण्याची LMEL ची ही भूमिका गडचिरोलीच्या विकासाला नवी दिशा देणारी ठरत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice













