अबुजमाड चकमक : ठार नक्षल्यांचा आकडा वाढला, २५ लाखांचा इनामी प्रभाकरसह आणखी ४ ठार
– ठार नक्षल्यांचा आकडा पोहचला ७ वर
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०६ : अबुजमाडच्या जंगलात गडचिरोली पोलिस दलाच्या सी-६० पथकाने राबविलेल्या नक्षलविरोधी अभियानात ठार नक्षल्यांचा आकडा वाढला आहे. दुपारपर्यंत तीन नक्षली ठार झाल्याची माहिती होती. मात्र, त्यानंतर सुरू असलेल्या शोधमोहीमेदरम्यान घटनास्थळावरून आणखी चार नक्षल्यांचे मृतदेह हस्तगत करण्यात आल्याने या चकमकीत ठार नक्षल्यांचा एकूण आकडा सातवर पोहोचला आहे. ठार झालेल्यांमध्ये चार पुरुष व तीन महिला नक्षल्यांचा समावेश आहे.
या चकमकीत २५ लाखांचा इनामी, सीपीआय (माओवादी) संघटनेचा वरिष्ठ नेता प्रभाकर ठार झाला आहे. घटनास्थळावरून ३ AK-47, १ SLR व १ .303 रायफल अशी पाच अग्निशस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान, सी-६० पथकातील जवान दीपक चिन्ना मडावी यांनी शौर्याने लढा देत वीरमरण पत्करले. त्यांना आज जिल्हा मुख्यालयात शासकीय इतमामात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली असून, उद्या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या अभियानात आणखी एक जवान जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ठार नक्षल्यांची सविस्तर ओळख, जप्त साहित्य व अभियानाचा अधिकृत तपशील उद्या गडचिरोली पोलिसांच्या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात येणार आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #naxal














