अबुजमाडच्या जंगलात पोलिस–नक्षल चकमक : तीन नक्षल ठार, C-60 जवान शहीद
-एक जवान जखमी
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०६ : अबुजमाडच्या घनदाट जंगलात सुरू असलेल्या माओवादीविरोधी अभियानादरम्यान पोलिस व नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले असून C-60 पथकातील एक जवान शहीद झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून सुरक्षा यंत्रणा सतर्क करण्यात आल्या आहेत.
घटनास्थळावरून आज सकाळी आणखी दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह हस्तगत करण्यात आले. यामध्ये एक पुरुष व एक महिला नक्षलवादी यांचा समावेश आहे. याआधी एका नक्षलवाद्याचा मृतदेह सापडला होता. आतापर्यंत एकूण तीन नक्षलवादी (दोन पुरुष व एक महिला) ठार झाले असून त्यांच्याकडून एक एके–४७ व एक एसएलआर रायफल जप्त करण्यात आली आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.
या चकमकीत गंभीर जखमी झालेले C-60 जवान दिपक चिन्ना मडावी (वय ३८, सध्या राहणार अहेरी, मूळ रा. मांड्रा, दामरांचा, ता. अहेरी) यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. अबुजमाडच्या जंगलातून आज पहाटे हेलिकॉप्टरच्या मदतीने त्यांना उपजिल्हा रुग्णालय, भामरागड येथे दाखल करण्यात आले होते. मात्र अभियानादरम्यान झालेल्या जखमांमुळे त्यांना वीरमरण आले. त्यांच्या बलिदानाने पोलीस दलासह संपूर्ण गडचिरोली जिल्हा शोकसागरात बुडाला आहे.
दरम्यान, या चकमकीत आणखी एक जवान जोगा मडावी (रा. किष्टयापल्ली) हे गोळी लागून जखमी झाले होते. त्यांना तत्काळ हेलिकॉप्टरद्वारे भामरागड येथे हलविण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून पुढील उपचारासाठी त्यांना लवकरच गडचिरोली येथे हलविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली.
अबुजमाडच्या जंगल परिसरात अद्याप शोधमोहीम सुरू असून, संभाव्य नक्षल हालचाली लक्षात घेता सुरक्षा यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या आहेत.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #AbujhmadEncounter #PoliceNaxalEncounter #C60Commando #MartyrJawan #NaxalitesKilled #Gadchiroli #AntiNaxalOperation #Bravehearts #InternalSecurity














