निमगाव : तेंदूपत्ता संकलन यंदा वनविभागामार्फत, ग्रामसभेचा एकमुखी निर्णय

64

निमगाव : तेंदूपत्ता संकलन यंदा वनविभागामार्फत, ग्रामसभेचा एकमुखी निर्णय
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ०५ : तेंदूपत्ता हंगाम २०२६ च्या संकलन व विक्री व्यवस्थापनाबाबत निमनवाडा ग्रामपंचायतीत पार पडलेल्या विशेष ग्रामसभेत निमगाव येथील तेंदूपत्ता संकलन, विक्री व संपूर्ण व्यवस्थापन वनविभागामार्फत करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. या निर्णयामुळे येत्या हंगामात तेंदूपत्ता संकलन अधिक शिस्तबद्ध, पारदर्शक व नियोजनबद्ध पद्धतीने होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
निमनवाडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणावर सरपंच सौ. छाया रविंद्र मडावी यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष ग्रामसभा पार पडली. ग्रामपंचायतीच्या हद्दीतील विविध गावांमधील एकूण १२८ ग्रामसभा सदस्य या बैठकीस उपस्थित होते.
सभेत तेंदूपत्ता हंगामाच्या व्यवस्थापनासाठी दोन पर्यायांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पहिला पर्याय वनविभागामार्फत संकलन व विक्री करण्याचा, तर दुसरा पर्याय ग्रामसभेमार्फत संकलन व विक्रीचा होता. उपस्थित सदस्यांनी दोन्ही पर्यायांतील फायदे-तोट्यांवर सखोल चर्चा केल्यानंतर, पर्याय क्रमांक एकावर एकमुखी सहमती दर्शविण्यात आली.
या संदर्भातील ठराव अधिकृतरीत्या मंजूर करण्यात आला असून, त्याची माहिती पुढील कार्यवाहीसाठी गटविकास अधिकारी, पंचायत समिती धानोरा यांच्याकडे ३० जानेवारी २०२६ रोजी पत्राद्वारे सादर करण्यात आली आहे.
यावेळी ग्रामपंचायत अधिकारी एस. एम. मुळे, ग्रामपंचायत सदस्य तसेच निमगाव, निमनवाडा, बोरी व मासरगाटा येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामसभेच्या या निर्णयाचे परिसरात स्वागत होत असून, तेंदूपत्ता संकलन प्रक्रियेत पारदर्शकता व प्रशासनिक शिस्त अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here