हुश्श! वनविभागाचे मध्यरात्रीचे ‘ऑपरेशन लेपर्ड’ यशस्वी : इंजेवारी–देऊळगाव परिसरात धुमाकुळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद
The गडविश्व
ता.प्र/ आरमोरी, दि. ११ : आरमोरी तालुक्यातील इंजेवारी–देऊळगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून दहशत माजवणाऱ्या आणि दोन महिलांचा बळी घेणाऱ्या बिबट्याला अखेर वनविभागाने मध्यरात्री (दि.११) सापळ्यात अडकवून जेरबंद केले. ‘ऑपरेशन लेपर्ड’ यशस्वी ठरल्याने भीतीच्या सावटाखाली जगणाऱ्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
आरमोरी तालुक्यातील इंजेवारी-देऊळगाव परिसरात बिबट्याचा मुक्त वावर सुरू असल्याने शेतात जाणे, रात्री बाहेर पडणेही कठीण झाले होते. त्यादरम्यान सलग झालेल्या दोन प्राणघातक हल्ल्यांमुळे संतप्त ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी मुख्य मार्गावर चक्काजाम आंदोलन छेडले होते आणि बिबट्याला तातडीने जेरबंद करण्याची मागणी केली होती.
या पार्श्वभूमीवर वनविभागाने तातडीने शोधमोहीम राबवत इंजेवारी–देऊळगाव परिसरात पाळत वाढवली. जलद प्रतिसाद पथक (RRT) गडचिरोली आणि स्थानिक वनकर्मचारी यांनी संयुक्त समन्वय साधत जंगल परिसरात विविध ठिकाणी सापळे उभारले. सततच्या निरीक्षणानंतर ११ डिसेंबरच्या मध्यरात्री बिबट्या अखेर पिंजऱ्यात अडकला.
वनविभागाच्या अथक, संयमी आणि अचूक कारवाईमुळे गेल्या काही दिवसांपासूनचे दहशतीचे वातावरण दूर झाले असून नागरिकांनी वनविभागाचे मनापासून कौतुक केले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchiroliforest #OperationLeopard #ForestDepartmentAction #LeopardCaptured #InjewariDeulgaon #Gadchiroli #RRTGadchiroli #WildlifeRescue #MidnightOperation #LeopardTrapped #PublicRelief













