गडचिरोली जिल्ह्यात हमीभावाने धान खरेदीला सुरूवात

91

गडचिरोली जिल्ह्यात हमीभावाने धान खरेदीला सुरूवात
– शेतकऱ्यांचा विश्वास वाढवणारी पारदर्शक प्रक्रिया सुरू – आदिवासी विकास महामंडळ
The गडविश्व
गडचिरोली दि ११ : शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला हमी दर मिळावा यासाठी केंद्र व राज्य शासन सक्रिय असून, जिल्ह्यात धान खरेदी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या खरेदी मोहिमेत कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी सर्व उपाययोजना राबविण्यात येत असून, धान खरेदी पारदर्शक पद्धतीने होत असल्याचे आदिवासी विकास महामंडळाने स्पष्ट केले आहे.

ऑनलाईन नोंदणी सुरळीत; आयरिस स्कॅनने पारदर्शकता

शासनाच्या BeAM पोर्टलद्वारे शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरू असून, शेतकऱ्यांना अद्ययावत ७/१२, बँक पासबुक, गाव नमुना ८-अ, जात स्वयंघोषणापत्र, आधारकार्ड आदी कागदपत्रांची आवश्यकता आहे. नोंदणीच्या ठिकाणी संबंधित शेतकऱ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती बंधनकारक ठेवण्यात आली आहे. आयरिस स्कॅन किंवा अंगठ्याच्या ठश्याद्वारेच नोंदणी स्वीकारली जात असल्याने काळाबाजार किंवा बनावट नोंदीला पूर्णतः आळा बसत असल्याचे महामंडळाचे म्हणणे आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम; गर्दीवर नियंत्रण

मागील हंगामातील तसेच प्रोत्साहनपर रकमेची संपूर्ण देयके शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहेत. धान विक्रीसाठी ज्यांचा क्रमांक आलेला आहे, त्यांनाच मोबाईल संदेशाद्वारे केंद्रावर हजर राहण्याची सूचना देण्यात येते. त्यामुळे खरेदी केंद्रांवरील अनावश्यक गर्दी टळत असून, प्रत्यक्ष शेतकरी हजर राहिल्यानंतरच नोंदणी व धान स्वीकृतीची कार्यवाही केली जाते.

धान उचल गतीमान; स्थानिक गिरण्यांचा कमी प्रतिसाद

शासनाकडून खरेदी केलेल्या धानाची उचल प्रामुख्याने स्थानिक गिरण्या करत असल्या तरी मागील काही वर्षांपासून मिळालेल्या अल्प प्रतिसादामुळे शेजारील जिल्ह्यांतील गिरण्यांद्वारे उचल सुरू आहे. धान उचल वेळेत पूर्ण व्हावी यासाठी कठोर पावले उचलण्यात येत असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरवर्षी २० लाख क्विंटल खरेदी; सीमावर्ती भागात ओट्यावर खरेदी

जिल्ह्यात दरवर्षी सरासरी २० लाख क्विंटल धान खरेदी केली जाते. यासाठी शासकीय व खाजगी गोदामे भाड्याने घेण्यात येतात. सीमावर्ती भागात गोदामांची कमतरता असल्यामुळे गरज पडल्यास शेतकऱ्यांना हमीभाव मिळण्यासाठी ओट्यावरही खरेदी केली जाते. त्या भागात अतिरिक्त गोदामे उभारण्यासाठी प्रयत्न वेगाने सुरू असल्याचेही प्रादेशिक कार्यालयाने सांगितले.

अनियमित संस्थांवर कारवाई कायम

धान खरेदी प्रक्रियेत अवास्तव घटी किंवा अनियमितता करणाऱ्या संस्थांवरच कारवाई करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील सर्व खरेदी केंद्रांवर काटेकोर नियंत्रण ठेवण्यात येत असून, अधिक माहितीसाठी प्रादेशिक कार्यालय, गडचिरोली येथे संपर्क साधण्याचे आवाहन आदिवासी विकास महामंडळ गडचिरोलीचे प्रादेशिक व्यवस्थापक यांनी केले.

#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolipolice #gadchirolinews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here