राज्यात ६०४ ‘आपला दवाखाने’ सुरू ; उर्वरित ९६ दवाखाने जानेवारी अखेर कार्यरत

83

राज्यात ६०४ ‘आपला दवाखाने’ सुरू ; उर्वरित ९६ दवाखाने जानेवारी अखेर कार्यरत
– मंत्री प्रकाश आबिटकर यांची विधानपरिषदेत माहिती
The गडविश्व
नागपूर, दि. ९ : सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सेवा सहज, विनामूल्य आणि तत्काळ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजना राज्यात व्यापक प्रमाणावर राबविण्यात येत आहे. राज्यात सध्या ६०४ आपला दवाखाने सुरू असून उर्वरित ९६ दवाखाने येत्या जानेवारी अखेर कार्यरत होणार आहेत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानपरिषदेत दिली.
सदस्य प्रवीण दरेकर यांनी आपला दवाखाना व आरोग्य वर्धिनी केंद्रे पूर्ण क्षमतेने सुरू करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेत सदस्य अभिजीत वंजारी, सचिन अहिर, प्रसाद लाड, परिणय फुके, निरंजन डावखरे, रणजितसिंह मोहिते, राजहंस सिंह, शशिकांत शिंदे, उमा खापरे आणि मनीषा कायंदे यांनी सहभाग घेतला.
मंत्री आबिटकर म्हणाले की, ही योजना सर्वसामान्य व गरीब नागरिकांसाठी असून, ती अधिक प्रभावी व गतिमान करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. राज्य शासनाने ७०० आपला दवाखाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच केंद्राच्या १५व्या वित्त आयोगाच्या निधीतून २,२३२ नागरी आरोग्य वर्धिनी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. यापैकी आतापर्यंत ६०४ आपला दवाखाने तसेच १,६४३ आरोग्य वर्धिनी केंद्रे सुरु आहेत.
राज्यातील आपला दवाखाना व आरोग्य वर्धिनी केंद्रांच्या कामकाजाची देखरेख संबंधित जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत होत असल्याचे आबिटकर यांनी सांगितले. या दवाखान्यांमध्ये फार्मासिस्ट नियुक्तीसाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असून, येत्या काळात सर्व संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन या केंद्रांचे कामकाज अधिक सक्षम आणि सुस्थितीत करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
आरोग्यसेवा लोकांपर्यंत पोहोचविण्याकरिता राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पावले उचलली असून, नव्या दवाखान्यांच्या सुरूवातीमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #gadchirolinews #gadchirolipolice #vidhanparishad #apaladavakhan

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here