एक गाव, एक वाचनालय : पोलिस दलातर्फे जिजगाव येथे ७२ वे सार्वजनिक वाचनालय उद्घाटन

137

The गडविश्व
गडचिरोली दि. १३ : गडचिरोली पोलीस दलाच्या “एक गाव, एक वाचनालय” या अभिनव उपक्रमांतर्गत भामरागड उपविभागातील अतिदुर्गम जिजगाव येथे ७२ वे सार्वजनिक वाचनालयाचे आज १३ सप्टेंबर ला लोकार्पण करण्यात आले. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते व वरिष्ठ अधिकारी तसेच नागरिकांच्या उपस्थितीत हा भव्य सोहळा पार पडला.
या कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथदिंडीने झाली. राष्ट्रध्वज फडकावत शालेय विद्यार्थी व स्थानिकांनी पारंपारिक वेशभूषा आणि वाद्यांसह उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. श्रमदान व लोकवर्गणीतून उभारण्यात आलेल्या या वाचनालयात अभ्यासिका, टेबल-खुर्च्या, पुस्तक कपाटे व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या वाचनालयामुळे परिसरातील शेकडो विद्यार्थी व युवक-युवतींना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यास मोठी मदत होणार आहे.
सन २०२३ पासून सुरु झालेल्या या उपक्रमातून जिल्ह्यात आतापर्यंत ७१ वाचनालये स्थापन झाली असून, त्याचा लाभ ८००० हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला आहे. यापैकी तब्बल २०५ विद्यार्थ्यांनी शासनाच्या विविध विभागांत यशस्वीरीत्या भरती मिळवली आहे. या सामाजिक उपक्रमामुळे गेल्या तीन वर्षांत गडचिरोली जिल्ह्यातून एकही तरुण माओवादी संघटनेत भरती झालेला नाही, ही लक्षणीय बाब आहे.
यावेळी पोलीस अधीक्षक नीलोत्पल म्हणाले, “वाचनालयाचा लाभ नागरिक व विद्यार्थी जास्तीत जास्त घ्यावा. या माध्यमातून प्रशासकीय सेवेत अधिकाधिक विद्यार्थी यावेत, यासाठी हा उपक्रम आहे. गडचिरोली पोलीस दल केवळ माओवादीविरोधी लढा देत नाही तर नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठीही कटिबद्ध आहे.”
कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश, सत्य साई कार्तिक, सीआरपीएफचे असिस्टंट कमांडंट अमित सिन्हा, एसआरपीएफचे पोउपनि प्रशांत नरखेडे, स्थानिक सरपंच, पोलीस पाटील, पत्रकार, प्रतिष्ठित नागरिक तसेच ५०० हून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते, पोउपनि शुभम शिंदे, नागरी कृती शाखेचे पोउपनि चंद्रकांत शेळके व पोस्टे मन्नेराजारामचे अधिकारी-अंमलदार यांनी विशेष परिश्रम घेतले.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchirolinews #latestnews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here