गडचिरोलीत हत्तींची दहशत ; वन विभागाच्या निष्क्रियतेवर ‘आप’चा संताप
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि. ११ : चुरचुरा जंगल परिसरात हृदयद्रावक हत्ती हल्ल्यात वामन मारोती गेडाम (६२) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने पुन्हा एकदा वन विभागाच्या निष्क्रियतेचा सवाल उभा केला असून, आम आदमी पक्षाचे जिल्हा सचिव अमृत मेहेर यांनी तीव्र शब्दांत रोष व्यक्त केला आहे.
मेहेर यांनी म्हटले, “हत्तींच्या हालचालींबाबत स्थानिकांना माहिती असूनही वन विभागाने कोणतीही पूर्वसूचना दिली नाही, पेट्रोलिंग केले नाही किंवा हत्तींचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न केला नाही. हा मृत्यू विभागाच्या लापरवाहीचा थेट परिणाम आहे. प्रशासन गरीब शेतकरी आणि आदिवासींच्या जीवाची किंमत शून्य समजते.”
गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत हत्तींमुळे ११ लोकांचा बळी गेला आहे. मेहेर पुढे म्हणाले, “शासन फक्त आकडेवारी सांगते; प्रत्यक्षात शेतकऱ्यांची शेती उध्वस्त होत आहे, गुरे चारण्यासाठी लोकांचा जीव धोक्यात आहे. छत्तीसगडमधून आलेल्या हत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणतीही उपाययोजना केली नाही. अधिकारी बसून आहेत, पण कारवाई शून्य आहे.”
घटनेनंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आला, परंतु डॉक्टर आणि कर्मचारी नसल्यामुळे कुटुंबीयांना रात्रभर हालअपेष्टा सहन करावी लागली. यावर संताप व्यक्त करत मेहेर म्हणाले, “मृत्यूनंतरही प्रशासनाची असंवेदनशीलता दिसून आली. जिल्हा रुग्णालयात मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. आदिवासी आणि गरीबांविषयी शासन किती उदासीन आहे, हे यातून स्पष्ट होते.”
आम्ही तात्काळ जिल्हाधिकारी आणि वन संरक्षकांना भेटणार आहोत आणि हत्तींच्या बंदोबस्तासाठी, पीडित कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी आंदोलन करणार आहोत,” असे मेहेर यांनी घोषित केले.
मेहेर यांनी शासनावर हल्लाबोल करताना म्हटले की, “भाजप शासनाच्या काळात हत्तींची दहशत वाढतच आहे. वन विभागाच्या निष्क्रियतेमुळे शेतकऱ्यांना शेती कशी करावी, असा प्रश्न पडला आहे. आम आदमी पक्ष आमच्या ‘आम आदमी’साठी लढतो, आणि हा लढा आम्ही सोडणार नाही. वामन गेडाम यांच्या कुटुंबाला ५० लाख रुपयांची मदत, हत्तींच्या बंदोबस्तासाठी तात्काळ कारवाई आणि वन विभागाच्या जबाबदाऱ्यांची चौकशी व्हावी, अशी आमची मागणी आहे. अन्यथा, आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत!”
आम आदमी पक्षाने या घटनेवर सर्व पक्षीय नेत्यांना एकत्र येऊन हत्ती समस्येवर तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews













