The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ११ : धानोरा पोलिसांनी अवैध गायी-बैल वाहतुकीवर मोठी धडक कारवाई करत १६ चाकी ट्रक जप्त केला असून तब्बल ५१ जनावरांची सुटका करण्यात आली आहे. यामध्ये ४४ जनावरे जिवंत तर ७ मृत अवस्थेत आढळली.
मिळालेल्या माहितीनुसार, ९ सप्टेंबरच्या मध्यरात्री धानोरा पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की मुंगनेरकडून धानोरा मार्गे गडचिरोलीकडे गायी-बैलांची अवैधरित्या वाहतूक होणार आहे. त्यानुसार पोलिसांनी नवीन बसस्टॉप परिसरात सापळा रचला. रात्री साडेबारा वाजता नारंगी रंगाचा अशोक लिलँड ट्रक (क्र. एम.एच. २७ बीएक्स ७९८३) संशयास्पदरीत्या धावताना दिसला. पोलिसांनी थांबविण्याचा इशारा दिल्यावर चालकाने वाहन थांबवून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. त्याचा एक साथीदार मात्र पोलिसांच्या हाती लागला.
वाहन तपासणीदरम्यान ट्रकमध्ये १८ बैल, २६ गायी अशी ४४ जनावरे जिवंत अवस्थेत तसेच ७ जनावरे मृत अवस्थेत आढळली. मृत जनावरांचे पोस्टमार्टम करून त्यांना दफन करण्यात आले तर जिवंत जनावरे गोशाळेत दाखल करण्यात आली. या कारवाईत ट्रकासह एकूण ४३ लाख ७९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice













