गडचिरोलीत कृषी विभागाची धडक तपासणी : २२ खत परवाने निलंबित, खते व बियाणे विक्रेत्यांवर कारवाई
The गडविश्व
गडचिरोली, दि. १० : गडचिरोली जिल्ह्यात शेतकऱ्यांना खते, बियाणे व कीटकनाशके विक्री करताना गैरव्यवहार करणाऱ्या कृषी केंद्रांवर जिल्हा कृषी विभागाने धडक कारवाई केली आहे. २९ कृषी केंद्रांची सुनावणी घेण्यात आली असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर परवाने निलंबन व रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
सुनावणीत २२ कृषी केंद्रांचे खत परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तर ४ रासायनिक खते, ३ बियाणे व ३ कीटकनाशक परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. विभागाच्या तपासणीत शेतकऱ्यांना जास्त दराने खते विक्री करणारी तब्बल १५ कृषी केंद्रे निष्पन्न झाली असून यात चामोर्शी (२), कुरखेडा (५), आरमोरी (५) आणि सिरोंचा (३) या तालुक्यांतील विक्रेत्यांचा समावेश आहे.
शेतकऱ्यांना उपलब्ध असूनही खते न देणे, एका शेतकऱ्याला एकाच वेळी २० पेक्षा अधिक युरियाच्या पोत्या देणे, परवाना अटींचे पालन न करणे अशा गंभीर उल्लंघनाचे प्रकार समोर आले आहेत. आरमोरी (१), सिरोंचा (२) व कुरखेडा (१) अशा एकूण ४ कृषी केंद्रांनी परवाना अटींचे उल्लंघन केल्याचे आढळले.
याशिवाय कुरखेडा (३), गडचिरोली (१) व चामोर्शी (१) या ठिकाणी एकूण ५ कृषी केंद्रांना ताकीद देण्यात आली आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती प्रीती हिरवळकर यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विक्रेत्यांना शासन माफ करणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आणखी कठोर कारवाई केली जाईल.”
या कारवाईमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत असले तरी नियमबाह्य विक्रेत्यांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #गडचिरोली #कृषीविभाग #खते #बियाणे #कीटकनाशके #शेतकरी #Fertilizer #Seeds #Agriculture #BreakingNews #Maharashtra #गडचिरोली #कृषीविभाग #खते #बियाणे #शेतकरी













