– ट्रक चालक फरार
The गडविश्व
चंद्रपूर दि. २९ : जिल्ह्यातील राजुरा-गडचांदूर मार्गावरील कापनगावजवळ २८ ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजता झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. विरुद्ध दिशेने वेगाने येणाऱ्या हायवा ट्रकने ॲटोला जबर धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश असून पाचगाव गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजुराहून पाचगावकडे जाणारी ॲटो कापनगावजवळ पोहोचली असता महामार्गावरील सुरू असलेल्या कामामुळे वाहतुकीचा मार्ग बदलण्यात आला होता. परंतु, कोणताही इशारा फलक लावण्यात न आल्याने ॲटोचालक संभ्रमात पडला आणि थेट हायवेवर गेला. त्याचवेळी समोरून आलेल्या हायवाने ॲटोला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेनंतर ॲटोचा अक्षरशः चक्काचूर झाला.
या अपघातात रवींद्र हरी बोबडे (४८, पाचगाव), शंकर कारू पिपरे (५०, कोची), वर्षा बंडू मांदळे (४१, खामोना), तनु सुभाष पिंपळकर (१८, पाचगाव), ताराबाई नानाजी पापुलवार (६०, पाचगाव) आणि ऑटोचालक प्रकाश मेश्राम (५०, पाचगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. जखमींमध्ये निर्मला रावजी झाडे (५०, पाचगाव) यांना गंभीर अवस्थेत चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले असून भोजराज महादेव कोडापे (४०, भुरकुंडा) यांच्यावर राजुरा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले आणि जखमींना उपचारासाठी हलविले. दरम्यान, अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला असून पोलिसांनी ट्रक जप्त करून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पुढील तपास ठाणेदार सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #chandrpurnews #accident













