कुरखेडा जनता दरबारात नागरिकांचा संताप : महामार्ग दुरवस्था आणि अवैध दारू विक्रीवर आमदार मसरामांचे कठोर निर्देश

364

The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. २९ : कुरखेडा तालुक्यात २८ ऑगस्ट रोजी जनता दरबारात नागरिकांनी प्रशासनाची उदासीनता चव्हाट्यावर आणली. राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था, रखडलेली पूलकामे आणि गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी असूनही उघडपणे सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीवर नागरिकांनी संताप व्यक्त केला.

महामार्गाच्या दुरवस्थेवर प्रश्नांचा भडीमार

सती नदीवरील दोन वर्षांपासून रखडलेले पुलाचे काम, गोठणगाव टी-पॉइंट ते जांभुळखेडा मार्गाची दयनीय अवस्था आणि कुरखेडा बाजारातील अतिक्रमण या मुद्यांवर नागरिकांनी महामार्ग विभागाला घेरले. निकृष्ट दर्जाचे नाले बांधकाम, अपूर्ण कामे आणि प्रशासन-नगरपंचायत यांच्यातील समन्वयाअभावी वाढलेला त्रास यावरून संतप्त नागरिकांनी कठोर प्रश्न उपस्थित केले. आमदार रामदास मसराम यांनी संबंधित विभागांना नागरिकांचा त्रास टाळण्यासाठी आणि कामाची गुणवत्ता सुधारण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याचे आदेश दिले.

अवैध दारू विक्रीवर पोलिसांना खडेबोल

पोलिसांनी वर्षभरात ११० कारवाया झाल्याचा अहवाल सादर केला, मात्र नागरिकांनी “मोठ्या दारू विक्रेत्यांना अभय, तर जंगलातील हातभट्टीवरच कारवाई” होत असल्याचा आरोप केला. आंबेडकर चौक, गांधी वार्ड, आझाद वार्डात दारू विक्री उघडपणे सुरू असल्याचे निदर्शनास आणून दिले. “कारवाईनंतरही जर विक्री थांबत नसेल, तर दारूबंदी हटवण्याचा विचार करा,” अशी मागणी नागरिकांनी विधानसभेत मांडण्याचे आमदारांना सांगितले. आमदार मसराम यांनी पोलिसांना अवैध दारू विक्रीवर कठोर कारवाई आणि दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले.

९० तक्रारींचे तात्काळ निराकरण

या जनता दरबारात नागरिकांनी विविध विभागांकडे तब्बल ९० लेखी तक्रारी सादर केल्या, ज्यापैकी अनेकांचे तात्काळ निराकरण करण्यात आले. पुढील जनता दरबारात प्रलंबित मुद्यांवर काय कार्यवाही झाली, याचा आढावा घेणार असल्याचा इशारा आमदारांनी दिला.

या वेळी नायब तहसीलदार राजकुमार धनबाते, तालुका काँग्रेस अध्यक्ष जीवन नाट, जिल्हा उपाध्यक्ष जयंत हरडे, विधानसभा प्रमुख परसराम टिकले, माजी सभापती गिरीधर तितराम आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार रामदास मसराम म्हणाले, “नागरिकांचा त्रास कमी करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. सर्व विभागांनी समन्वयाने काम करून गुणवत्तापूर्ण सेवा द्यावी. अन्यथा पुढील जनता दरबारात कठोर कारवाई होईल.”
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here