गडचिरोलीत पायाभूत सुविधांचा अभाव ; महायुती सरकारची उदासीनता उघड

443

The गडविश्व
ता. प्र /कुरखेडा (चेतन गहाणे), दि २७: नक्षत्रमाळ ग्रामीण भागातील गडचिरोली जिल्ह्यात पायाभूत सुविधांच्या अभावामुळे नागरिकांच्या जीवनाला गंभीर धोके निर्माण झाले असून, महायुती सरकारची याबाबतची उदासीनता उघड होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाही रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि विकासकामांना आवश्यक ते प्राधान्य मिळत नसल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिक संघटनांमध्ये संतापाची लाट आहे.
गेल्या काही दिवसांत डेंगूच्या प्रादुर्भावामुळे चार जणांचा मृत्यू झाला असून, जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी उपकरणे व औषधांचा तुटवडा असल्याचे समोर आले आहे. आरोग्य यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी व दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असले तरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे.
शिक्षण क्षेत्राचीही दयनीय अवस्था असून अनेक शाळांमध्ये शिक्षकांची टंचाई, जीर्ण इमारती आणि पाणी-वीज यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव आहे. परिणामी विद्यार्थ्यांची संख्या घटत चालली आहे. या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने “शाळा बचाव आंदोलन” छेडले असून शेकडो पालक व कार्यकर्त्यांनी यात सहभाग घेतला आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग व प्रमुख रस्त्यांचे कामही कासवगतीने सुरू असून पावसाळ्यात अनेक मार्ग चिखलमय होऊन प्रवास कठीण झाला आहे. NHAI ने गती वाढवण्याचे आश्वासन दिले असले तरी प्रत्यक्षात कोणतीही ठोस प्रगती दिसत नाही.
स्थानिक नेत्यांनी सरकारवर टीका करताना स्पष्ट केले की, “गडचिरोलीसारख्या आदिवासी बहुल जिल्ह्याला प्राधान्य देण्याचे आश्वासन महायुतीने दिले होते. मात्र वास्तवात डेंगू, शिक्षण व रस्त्यांच्या समस्यांनी जिल्हावासीयांना त्रस्त केले असून सरकारची विफलता स्पष्ट झाली आहे.”
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here