स्टील प्लांट, शिक्षण, आरोग्य, आणि विकासाच्या नवसंभावनांचा उगम! कोनसरीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते एलएमईएल प्रकल्पांचे उद्घाटन
The गडविश्व
गडचिरोली, ता. २१ : औद्योगिकदृष्ट्या मागास मानल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याच्या नशिबी प्रगतीचा नवा पहाट उजाडतो आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी (ता. २२ जुलै) कोनसरी येथे लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल) च्या भव्य एकात्मिक पोलाद प्रकल्पाची पायाभरणी होणार असून, विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे उद्घाटनही होणार आहे.
या औद्योगिक महाउत्सवात मुख्यमंत्री फडणवीस हेडरी येथील ५ एमटीपीए लोहखनिज ग्राइंडिंग प्लांटचा पहिला टप्पा, हेडरी-कोनसरीदरम्यान १० एमटीपीए स्लरी पाइपलाइन आणि कोनसरी येथील ४ एमटीपीए पेलेट प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत. याशिवाय ४.५ एमटीपीए क्षमतेच्या एकात्मिक पोलाद प्रकल्पाचे तसेच १००-खाटांच्या रुग्णालयाचे, सीबीएसई शाळेचे व सोमनपल्ली येथील कर्मचारी वसाहतीचे भूमिपूजनही त्यांच्या हस्ते होणार आहे.
या ऐतिहासिक सोहळ्याला सहपालकमंत्री अॅड. आशीष जयस्वाल, आमदार धर्मरावबाबा आत्राम, डॉ. मिलिंद नरोटे, एलएमईएलचे एमडी बी. प्रभाकरन, डीआयजी अंकित गोयल, जिल्हाधिकारी अविश्यंत पंडा, पद्मश्री तुलसी मुंडा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात सुरजागड लोहखनिज खाणी व कोनसरीतील प्रकल्पांमुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. शरणागती पत्करलेल्या माओवाद्यांना कौशल्य प्रशिक्षण देत त्यांना उद्योग क्षेत्रात सामावून घेण्याचे स्तुत्य कार्य एलएमईएलने केले आहे.
एलएमईएलचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांनी सांगितले की, “२२ जुलै २०२५ हा दिवस महाराष्ट्राच्या औद्योगिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल. गडचिरोलीचा ‘स्टील हब’ म्हणून उदय हे ऐतिहासिक स्वप्न साकार होण्याचे हे पहिले पाऊल आहे.”
या भव्य एकात्मिक प्रकल्पामुळे गडचिरोलीचा औद्योगिक चेहरा बदलणार असून, ‘ग्रीन स्टील’ निर्मितीसह देशाच्या अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी मिळणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि एलएमईएलच्या सहभागामुळे गडचिरोलीच्या औद्योगिक क्रांतीस नवे बळ मिळाले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #गडचिरोलीउद्योग #स्टीलहब #कोनसरीप्रकल्प #मुख्यमंत्रीफडणवीस #LMEEL #GreenSteel #औद्योगिकक्रांती










