अमिर्झा ग्रामपंचायतीला हादरा : लाचखोरीप्रकरणी सरपंच व सदस्य अपात्र

66

The गडविश्व
गडचिरोली, दि. २७ : तालुक्यातील अमिर्झा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या नालीतील गाळ उपशाचे बिल मंजूर करण्यासाठी कंत्राटदाराकडून लाच घेताना रंगेहाथ पकडल्या गेलेल्या सरपंच व सदस्याला अखेर अपात्र ठरवण्यात आले आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाने दिलेल्या निकालात सरपंच सोनाली गोकुलदास नागापुरे आणि सदस्य अजय भास्कर नागापुरे यांची ग्रामपंचायत सदस्यत्वासाठी अयोग्यता घोषित केली आहे.
सन २०२२-२३ मध्ये अमिर्झा गावात नालीतील गाळ उपसण्याचे काम १.७७ लाख रुपयांना मंजूर झाले होते. यापैकी १.३२ लाख रुपये दोन टप्प्यांत देण्यात आले. उर्वरित ४५ हजार रुपये मंजूर करण्यासाठी सरपंच व सदस्याने मिळून कंत्राटदार प्रेमचंद परशुराम धाकडे (रा. धुंडेशिवणी) यांच्याकडे पाच हजार रुपयांची लाचेची मागणी केली. तडजोडीअंती चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २०२३ मध्ये अमिर्झा टोली येथे दोघांना रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर प्रकरण विभागीय आयुक्तांच्या न्यायालयात पोहोचले होते. ७ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या सुनावणीअंती, १० जून रोजी विभागीय अपर आयुक्त डॉ. माधवी खोडे यांनी अपात्रतेचा आदेश दिला. जिल्हा परिषद गडचिरोलीने १९ जून रोजी आदेशाची अंमलबजावणी करून ग्रामपंचायतीस कळविले.
या कारवाईमुळे ग्रामपंचायतीत खळबळ उडाली असून, स्वच्छ व पारदर्शक कारभाराच्या दाव्यांना तडा गेला आहे. ग्रामीण भागातही भ्रष्टाचाराविरोधातील शासकीय यंत्रणांची कार्यवाही ठोसपणे होत असल्याचे या निर्णयातून अधोरेखित झाले आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #Amirzha #VillagePolitics
#CorruptionExposed #SarpanchRemoved #BribeScandal #AntiCorruptionDrive #LocalGovernance #PanchayatNews #TransparencyMatters #CaughtRedHanded #Accountability #RuralIndia #GrassrootsGovernance
#MarathiNews #गडचिरोली #अमिर्झा #ग्रामपंचायत #सरपंचअपात्र #लाचखोरी #भ्रष्टाचार #विभागीयआयुक्त #गावविकास

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here