गडचिरोलीत काँग्रेसचा सर्जिकल स्ट्राइक : ‘हेलिकॉप्टर’ देऊन अधिकाऱ्यांना दिली जाग

432

The गडविश्व
गडचिरोली, दि. २६ : जिल्ह्यातील जनतेच्या मूलभूत समस्यांकडे प्रशासनाचे आणि पालकमंत्र्यांचे सुरू असलेले दुर्लक्ष हाणून पाडण्यासाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेसने आज एक आगळंवेगळं आंदोलन केलं. “हेलिकॉप्टर घ्या, पण गाव/तालुक्यात या, साहेब!” अशा घोषणांनी प्रशासनाचे लक्ष वेधत, काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना हेलिकॉप्टरच्या प्रतिकृती आणि निवेदने देत आपला संताप व्यक्त केला.
राज्याचे मुख्यमंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस मागील तीन वर्षांपासून जिल्ह्याच्या विकासाची सूत्रे हाती घेत आहेत. मात्र, प्रत्यक्षात शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगार आणि सामान्य नागरिकांच्या समस्या सुटण्याऐवजी अधिकच गंभीर झाल्या आहेत.
वादळामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असूनही अद्याप मदतीचा ठावठिकाणा नाही. सुरजागड खाणीतून होणारी अवजड वाहतूक, दयनीय रस्त्यांची अवस्था, रानटी हत्तींचा त्रास, घरकुलासाठी न मिळणारी रेती, थकीत कंत्राटदारांचे बिल, मनरेगा वीज समस्या, सार्वजनिक वाहतुकीची बोंबाबोंब – अशा कित्येक मुद्द्यांवर काँग्रेसने आवाज उठवला.पालकमंत्री दरवेळी फक्त हेलिकॉप्टरने कार्यक्रमासाठी येतात आणि तासाभरातच परत जातात. तालुक्याच्या खेड्यापाड्यांत जनतेची स्थिती काय आहे, हे जाणून घेण्यासाठी ते कधीच फिरत नाहीत, असा आरोप काँग्रेसने यावेळी केला. अधिकाऱ्यांचीही हीच अवस्था असून, नागरिकांनी त्यांना भेटण्यासाठी कार्यालयात गेले तरी “साहेब मीटिंगमध्ये आहेत” हे ठरलेलं उत्तर मिळतं, असं काँग्रेसने म्हटलं आहे.
या आंदोलनाचं नेतृत्व काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केलं. त्यांनी पालकमंत्र्यांनी प्रत्यक्ष जिल्ह्याच्या अंतर्गत भागात येऊन जनतेच्या व्यथा ऐकाव्यात, अशी मागणी केली.
या आंदोलनात आमदार रामदास मसराम, माजी जि.प. उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, शहर अध्यक्ष सतीश विधाते, तालुकाध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विविध सेलचे पदाधिकारी, महिला, युवक, शेतकरी, बेरोजगार वर्ग यावेळी आंदोलनात उतरले होते.
“विकास हवा तर फक्त हेलिकॉप्टरने नव्हे, तर जमिनीवर उतरून जनतेत मिसळा,” असा सणसणीत संदेश काँग्रेसने प्रशासन आणि शासनाला दिला आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #हेलिकॉप्टरआंदोलन #गडचिरोलीकाँग्रेस #पालकमंत्रीगावातया #जनतेचादर्द #हेलिकॉप्टरनेनको #गावकडचंवास्तव
#CongressProtest #GadchiroliNews #HelicopterPolitics
#GroundReality #CMVisitDemand #जनतेसाठीचंआंदोलन
#PoliticalProtest #AdministrativeNeglect #HelicopterVsGroundWork

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here