– दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
The गडविश्व
गडचिरोली, दि. २६ : जिल्ह्यात अंमली पदार्थांची तस्करी, बेकायदेशीर विक्री व सेवन यासारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिलेल्या कठोर निर्देशांच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाने 2025 या वर्षात आतापर्यंत एकूण दोन लाख रुपयांचा अंमली पदार्थ जप्त करून सात आरोपींना अटक केली असून दोन आरोपींविरुद्ध अंमली पदार्थ सेवनप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत.
आज, 26 जून 2025 रोजी जागतिक अंमली पदार्थविरोधी दिनानिमित्त जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात अवैध अंमली पदार्थविक्री व सेवनविरोधात विशेष मोहिम राबविण्यात आली. याच अनुषंगाने अंमली पदार्थसंबंधित गुन्हे व फरार आरोपींचा शोध घेऊन अंमली पदार्थ विक्रीस प्रतिबंध घालण्याकरिता प्रभावी तपास करण्यात आला.
17 एप्रिल 2025 रोजी इंदिरानगर चेक पोस्टजवळ अपघातग्रस्त दुचाकीस्वाराकडून 472 ग्रॅम गांजा (किंमत रु. 9500/-) हस्तगत करण्यात आला. गुप्त बातमीदार व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करताना संबंधित आरोपी हा 17 वर्षीय अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या चौकशीतून वनमाळी लहानु जेंगठे (वय 46, रा. कोसरी, ता. आरमोरी) या इसमाचे नाव समोर आले. त्याच्या निवासस्थानी छापा टाकून 1 किलो 4 ग्रॅम गांजा (एकूण 1476 ग्रॅम, किंमत रु. 34,500/-) जप्त करण्यात आला असून त्यास 23 जून 2025 रोजी अटक करण्यात आली.
तसेच 19 मे 2025 रोजी दाखल असलेल्या NDPS कायद्यातील गुन्हा क्रमांक 316/2025 अंतर्गत फरार आरोपी बालाजी अंबादास रामटेके (रा. साखरा) यास 23 जून 2025 रोजी गडचिरोली पोलिसांनी तांत्रिक तपास कौशल्याच्या आधारे अटक केली आहे.
या सर्व कारवायांमध्ये गडचिरोली पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी 2025 मध्ये आतापर्यंत 5 गुन्ह्यांतून सात आरोपींवर कारवाई करून एकूण दोन लाख रुपयांचा गांजा जप्त केला असून अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या दोन व्यक्तींवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) सत्यसाई कार्तिक, उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. विनोद चव्हाण यांच्या नेतृत्वात सपोनि. शरद मेश्राम, पो.उ.नि. चैतन्य काटकर, माधुरी मिसाळ, अश्विनी पाटील, दिपक चव्हाण, दिपक मोहिते, पो.अं. धनंजय चौधरी, स्वप्निल कुडावले, नरेश मेश्राम, स्वदिप मेश्राम, तुषार खोब्रागडे, राजेंद्र पुरी, ताजूद्दीन गोवर्धन, अतुल भैसारे, मनोज कन्नाके, फोटोग्राफर पिदूरकर, संतोष नादरगे यांनी संयुक्तरित्या पार पाडली.
गडचिरोली पोलीस दलाची अंमली पदार्थविरोधातील ही कठोर कारवाई जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची ठरली आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #WarOnDrugs #AntiNarcoticsDrive #DrugFreeIndia #NDPSAct #SayNoToDrugs #PoliceAction #DrugBust #YouthAgainstDrugs #SafeSociety #LawAndOrder #StopDrugAbuse