The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. २३ : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, निमगाव येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. नव्याने दाखल झालेल्या बालचमूंना शाळेत उत्सवमय वातावरणात पारंपरिक पद्धतीने स्वागत करून शिक्षणाच्या प्रवासाला सुरुवात करण्यात आली.
विशेष म्हणजे, या स्वागतासाठी शाळेचे माजी विद्यार्थी स्वतः पुढे सरसावले. पारंपरिक मांजरी वाद्यांच्या तालावर विद्यार्थ्यांची गावातील मुख्य रस्त्यावरून मिरवणूक काढण्यात आली. विद्यार्थ्यांचे फुलांनी, पावलांच्या ठशांनी, मिठाई व शालेय साहित्य वाटप करून मनःपूर्वक स्वागत करण्यात आले. रंगीबेरंगी फुगे, फलक, रांगोळ्या आणि सेल्फी पॉइंटने सजवलेल्या शाळा परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाजनजी वरखंडे यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार अलपेश बारापत्रे उपस्थित होते. या वेळी पालक, शिक्षक, ग्रामस्थ आणि शाळा समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्याध्यापक देवेंद्र लांजेवार व शिक्षकांनी पालकांना शाळेतील उपक्रमांची, गुणवत्तापूर्ण शिक्षण व शैक्षणिक धोरणांची माहिती दिली. उपस्थित पालकांनी शाळेच्या उपक्रमांचे आणि वाढत्या दर्जाचे मनापासून कौतुक केले.
शाळेतील शिक्षकांनीही ताल धरत विद्यार्थ्यांसोबत नाचत स्वागत करून साऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले. माजी विद्यार्थ्यांचा शाळेबद्दलचा अभिमान व कृतज्ञता या उपक्रमातून दिसून आली.

( #thegdv #thegadvishva #gadchirolinews #BackToSchoolCelebration #WelcomeLittleLearners #ProudAlumniMoments #EducationFestival #SchoolBeginsWithJoy
#शाळाप्रवेशोत्सव2025 #उज्वलभविष्याचीपायाभरणी #गडचिरोलीशिक्षणउत्सव #विद्यार्थीप्रेरणा #शिक्षणगडचिरोली)