गडचिरोलीत शाळा प्रवेशोत्सव उत्साहात; सहपालकमंत्री जयस्वाल यांचा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश

29

The गडविश्व
गडचिरोली, दि. २३ : “शिक्षण क्षेत्रातील गुंतवणूक ही उज्ज्वल भविष्याची पायाभरणी आहे,” असे प्रतिपादन राज्याचे वित्त, कृषी, मदत व पुनर्वसन, कामगार राज्यमंत्री व गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी आज येथे केले.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा, मुरखळा येथे ‘शाळा प्रवेशोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा झाला. सहपालकमंत्री जयस्वाल यांच्या उपस्थितीत नवागत विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली आणि शाळेच्या पहिल्या दिवसाचे स्वागत उत्सवमय वातावरणात झाले.
कार्यक्रमाला शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे, सरपंच दशरथ चांदेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जगदीश चौधरी, मुख्याध्यापक दौलत घोडाम व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना संबोधित करताना जयस्वाल म्हणाले, “गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही दर्जेदार शिक्षण मिळावे, हीच शासनाची प्राथमिकता आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक गुणवत्ता निर्माण व्हावी, यासाठी दर्जा उंचावण्याचे काम सुरू आहे. शिक्षणाच्या माध्यमातून देश घडतो आणि प्रगत होते.”
शाळेचा पहिला दिवस प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असल्याचे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासात मन लावण्याचा, शिक्षकांचे मार्गदर्शन ऐकण्याचा आणि आपल्या कुटुंब, गाव व देशाचा अभिमान वाढवण्याचा संदेश दिला.
या कार्यक्रमात १९५० साली शाळेतील पहिले विद्यार्थी असलेले वासुदेव मांदाळे यांचा सहपालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला शिक्षक, पालक, विद्यार्थी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #शाळाप्रवेशोत्सव2025 #उज्वलभविष्याचीपायाभरणी #गडचिरोलीशिक्षणउत्सव #विद्यार्थीप्रेरणा #शिक्षणगडचिरोली)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here