गडचिरोली : चक्क न्यायालयाच्या आवारातच ‘त्याने’ केले मद्यपान, गुन्हा दाखल

836

– गडचिरोलीतील दारूबंदीची पोलखोल
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, (चेतन गहाणे) : तीन दशकांपासून दारूबंदी लागू असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात कायद्याची सर्रास पायमल्ली होत असल्याचे भेदक वास्तव पुन्हा एकदा उघड झाले आहे. कुरखेडा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या आवारात चक्क एका वकिलाच्या चालकाने मद्यपान करत पोलिसांची व न्याययंत्रणेचीही थेट थट्टा केली. या धक्कादायक प्रकारामुळे दारूबंदी कायद्याच्या अंमलबजावणीवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
ही घटना १८ जून रोजी दुपारी दीडच्या सुमारास घडली. राजू केशवराव मेश्राम (५५, रा. ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर) असे अटक करण्यात आलेल्या चालकाचे नाव असून, तो ब्रम्हपुरीतील एका वकिलासोबत कुरखेडा न्यायालयात आला होता. वकील कामात गुंतलेले असताना, मेश्राम याने वॉटर कुलरमधून बाटलीत पाणी भरले व त्यात आणलेल्या दारूच्या बाटलीतील मद्य मिसळून खुलेआम प्यायला सुरुवात केली.
दरम्यान, तेथे गेलेल्या न्यायालयीन लिपिकाच्या लक्षात ही घटना येताच त्याने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने अरेरावी केली. त्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी झडती घेतली असता त्याच्याजवळ आणखी एक मद्याच्या बाटलीसह तो आढळून आला. त्यानंतर त्याला वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांनी यास दुजोरा दिला.

दारूबंदी केवळ कागदावरच! प्रशासन झोपेत की हातमिळवणीमध्ये?

गडचिरोली जिल्ह्यात १९९० च्या दशकापासून दारूबंदी आहे. मात्र प्रत्यक्षात जिल्ह्यातील बहुतांश भागांत सर्रास अवैध दारूविक्री सुरू आहे. दर काही महिन्यांनी पोलीस “कारवाई” करून मोकळी श्वास घेतात, आणि काही दिवसांतच हे दारू माफिया पुन्हा सक्रिय होतात. यंत्रणा, पोलीस व राजकीय पाठबळाचा संपूर्ण संगनमताचा हा खेळ गेली अनेक वर्षे सुरू आहे.
कुरखेडा परिसरात मागील काही वर्षांत अवैध दारूविक्रीने पुन्हा उग्र रूप धारण केले असून, आता तर न्यायालयाच्या परिसरात मद्यपान होत असेल, तर उर्वरित परिसराची काय अवस्था असेल याची कल्पनाही न केलेली बरी. दारूबंदी कायद्याला नाके मुठी दाखवणाऱ्या या घटनांमुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये संतापाचा सूर आहे.

जिल्ह्यातील नागरिकांचा संतप्त सवाल – बंदी फक्त जनतेसाठी, माफियांना मोकळीक कशासाठी?

या घटनेनंतर पुन्हा एकदा जिल्ह्यातील दारूबंदीच्या अर्थहीनतेची चर्चा सुरू झाली आहे. प्रशासन आणि पोलीस दल या प्रकारांबाबत खरोखरच गंभीर आहेत की केवळ देखावा करत आहेत, असा प्रश्न आता उघडपणे विचारला जात आहे. दारूबंदीचं केवळ ढोल न वाजवता, खऱ्या अर्थाने अमलात आणा, अन्यथा बंदी उठवा! अशी एकच ठाम मागणी कुरखेडावासीयांसह जिल्ह्याच्या जनतेचं आता पोलिसांकडे केली आहे.

( #thegdv #gadchirolinews #gadchirolipolice #thegadvishva #crimenews #LiquorBanViolation #GadchiroliRealityCheck #JusticeUnderInfluence #AlcoholInCourtPremises #DryDistrictScandal #LawlessLiquor #BanOnlyOnPaper #IllegalLiquorTrade #MockeryOfProhibition #WakeUpGadchiroli #Breakingnews
#दारूबंदीचीविटंबना #गडचिरोली_दारूबंदी #न्यायालयातदारू #कायद्याचीथट्टा #अवैधदारूविक्री #दारूबंदीकेवळकागदावर #गडचिरोलीचीकाळीछाया #दारू_माफियांचा_साखळी #पोलिसांचीपरीक्षा #गडचिरोली_जागंहो)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here