The गडविश्व
गडचिरोली, दि. १५ : गडचिरोली जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात सकारात्मक बदल घडवत, भारत सरकारच्या ‘कायकल्प’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. स्वच्छता, संक्रमण नियंत्रण, कचरा व्यवस्थापन, रुग्णसुरक्षा आणि वैद्यकीय सुविधा यामध्ये गुणवत्ता राखून आरोग्य संस्थांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली असून, यंदा जिल्ह्यातील 9 आरोग्य संस्थांना ‘कायकल्प’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र देलनवाडी यांना प्रथम पुरस्काराने गौरवण्यात आले आहे, तर आरेवाडा, मालेवाडा, कूरुड, आलापल्ली आणि जीमेलगट्टा या प्रा. केंद्रांना प्रोत्साहनपर पुरस्कार मिळाले आहेत. तसेच वाकडी, विसोरा आणि घाटी येथील आरोग्य उपकेंद्रांनाही पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
या योजनेमुळे जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये स्वच्छतागृहांची स्थिती सुधारली आहे, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची उपलब्धता वाढली असून, ऑपरेशन थिएटरमध्ये निर्जंतुकीकरणाच्या कठोर नियमांचे पालन सुनिश्चित करण्यात आले आहे. यामुळे रुग्णांचा आरोग्य संस्थांवरील विश्वास वाढला असून, त्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार सेवा मिळत आहेत.
या योजनेत विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. देलनवाडी येथील डॉ. संजय सुपारे, मालेवाडा येथील डॉ. प्रमोद उंदीरवाडे, आरेवाडा येथील डॉ. सतीश तिरणकर, आलापल्ली येथील डॉ. उईके मॅडम, जीमेलगट्टा येथील डॉ. किरण वानखेडे व डॉ. दुर्गा जराते, तसेच वाकडी उपकेंद्राच्या डॉ. स्वाती कांबळी यांनी आपल्या कार्यातून ‘कायकल्प’ योजनेच्या उद्दिष्टांची प्रभावी अंमलबजावणी साधली आहे.
या यशस्वी उपक्रमामागे जिल्हा समन्वयक डॉ. अनुपम महेशगौरी आणि जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. प्रफुल्ल हुलके यांचे मोलाचे योगदान असून, त्यांच्या कार्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुहास गाडे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
‘कायकल्प’ ही केवळ स्वच्छतेपुरती मर्यादित न राहता, आरोग्य व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलणारी व्यापक योजना ठरत असून, भविष्यातही तिची प्रभावी अंमलबजावणी सुरू राहील आणि जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार व सुरक्षित आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे, असेही यावेळी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchirolinews #localnews #latestnews )