शिवाजी हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा ४० वर्षांनंतर स्नेहमेळावा

98

– आठवणींचा पाऊस आणि गुरुजनांचा सन्मान
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. १५ : चार दशकांनंतर जुन्या आठवणींना उजाळा देत आणि गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करत शिवाजी हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या १९८३-८६ या बॅचमधील सुमारे दीडशे माजी विद्यार्थी पुन्हा एकत्र आले. या ऐतिहासिक स्नेहमेळाव्याने शाळेच्या प्रांगणात जुन्या काळातील हास्य, उत्साह आणि भावना यांचा पुनर्जन्म घडवला.
या भव्य कार्यक्रमाचे नियोजन १९८५ च्या बॅचच्या मनीषा भरणे आणि सविता वाघरे या दोघींनी चार महिन्यांच्या मेहनतीतून उभे केले. फोन, सोशल मीडिया आणि वैयक्तिक संपर्कांद्वारे त्यांनी शेकडो सहाध्यायांना एकत्र आणले. “हा फक्त कार्यक्रम नव्हता, तर काळाच्या सीमारेषा ओलांडून पुन्हा एकत्र येण्याचा भावनिक क्षण होता,” असे मनीषा भरणे यांनी नमूद केले.
कार्यक्रमात शाळेतील माजी शिक्षकांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचे ऋण मान्य केले. अनेक शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल आनंद व्यक्त केला. “तुमच्यातून अनेक डॉक्टर, अभियंते, शिक्षक घडले, हीच आमची कमाई आहे,” असा भावूक प्रतिसाद एका शिक्षकांनी दिला.
कार्यक्रमात जुन्या खोड्यांचे किस्से, वर्गातील गमती, परीक्षांचे ताण आणि निरोप समारंभातील क्षण अशा अनेक आठवणींनी उपस्थितांना हसवले, काही वेळा डोळेही पाणावले. काही माजी विद्यार्थ्यांनी आपली जीवनयात्रा उलगडली आणि शाळेच्या संस्कारांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
सविता भरणे आणि दामोदर अंबादे यांच्या खुमासदार निवेदनाने कार्यक्रम अधिक रंगतदार झाला. गाणी, नृत्य, छोटेखानी नाटिका यांमधून शालेय जीवन पुन्हा अनुभवायला मिळाले. संध्याकाळच्या सहभोजनात माजी विद्यार्थी आणि शिक्षकांनी मनमोकळ्या गप्पा मारत, भविष्यातील स्नेहमेळाव्याचे निर्धाराने नियोजन केले.
या स्नेहमेळाव्याने केवळ आठवणींना उजाळा दिला नाही, तर जुन्या नात्यांची उब पुन्हा जाणवून दिली. शाळेच्या विकासासाठी योगदान देण्याचा निर्धार अनेकांनी व्यक्त केला. माजी विद्यार्थी संघटनाही अधिक सक्रिय करण्याचा प्रस्ताव पुढे आला.
मैत्री, स्नेह आणि गुरुवंदना यांच्या सागरात चिंब भिजलेल्या या सोहळ्याने सिद्ध केले की, काळ कितीही पुढे गेला, तरी शाळेच्या आठवणी आणि संबंध या सदैव हृदयात कोरलेले असतात. ४० वर्षांनंतरही तीच ओढ, तोच आत्मीय भाव आणि तोच जुना शाळकरी उत्साह आज पुन्हा अनुभवता आला – आणि तोच या स्नेहमेळाव्याचा खरा गाभा ठरला.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here