कोनसरीतील १९ महिला एलएमईएलच्या कार्यबलात दाखल; सक्षमीकरणाचा नवा अध्याय
The गडविश्व
कोनसरी, दि. १२ : लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल) तर्फे राबविण्यात आलेल्या कौशल्य विकास उपक्रमातून कोनसरी गावातील १९ महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. हलकी मोटार वाहन चालविण्याचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या या महिला आता कंपनीच्या कुशल कार्यबलात सामील झाल्या आहेत.
यंदा जून महिन्यात एलएमईएलने या महिलांना मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथील अशोक लेलँड प्रशिक्षण केंद्रात ४५ दिवसांच्या निवासी प्रशिक्षणासाठी पाठवले होते. वाहनचालक प्रशिक्षणादरम्यान महिलांनी आत्मनिर्भरतेचे कौशल्य आत्मसात केले. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला असून कुटुंबीयांनाही अभिमान वाटू लागला आहे.
कोनसरी येथील लॉईड्स कौशल्य विकास आणि प्रशिक्षण केंद्रात आयोजित समारंभात या महिलांना नियुक्तीपत्रे, प्रमाणपत्रे, वाहनचालक परवाने व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
या वेळी एलएमईएलचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले की, “समुदाय सक्षमीकरण व कार्यबलातील लैंगिक समानता हा कंपनीच्या कार्यपद्धतीचा पाया आहे. व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांच्या दृष्टीकोनातून स्थानिक महिलांना प्रगतीची नवी दारे खुली करणे हे आमचे ध्येय आहे.” शिस्त, सुरक्षितता आणि जबाबदारी अंगीकारून उच्च पदांवर प्रगती करण्याचे मार्गदर्शनही या महिलांना करण्यात आले.
एलएमईएलच्या या उपक्रमामुळे कोनसरीतील महिलांना केवळ रोजगारच नव्हे, तर आत्मविश्वास आणि सामाजिक प्रतिष्ठाही लाभली आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice













