– शेतकऱ्यांनी नोंदणीकृत केंद्रांवरच धान विक्री करण्याचे जिल्हाधिकारी पंडा यांचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. १२ : पणन हंगाम २०२५-२६ साठी गडचिरोली जिल्ह्यात धान खरेदी प्रक्रिया वेगाने सुरू झाली असून शासनाने निश्चित केलेल्या हमीभावात शेतकऱ्यांना थेट लाभ मिळावा यासाठी या वर्षी तब्बल १०१ खरेदी केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांनी कोणत्याही खाजगी व्यापाऱ्यांच्या आमिषांना बळी न पडता नोंदणीकृत शासनमान्य केंद्रांवरच धान विक्री करावी, असे स्पष्ट आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
शासनाने या वर्षी धानासाठी रु. २३६९ प्रति क्विंटल इतका दर मंजूर केला असून जिल्हा प्रशासनाच्या देखरेखीखाली खरेदी केंद्रांवर सुयोग्य आणि पारदर्शक पद्धतीने प्रक्रिया पार पडत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील मंजूर खरेदी केंद्रांचा तपशील
– मार्केटिंग फेडरेशन कार्यालय अंतर्गत : २१ केंद्रे
– प्रादेशिक व्यवस्थापक कार्यालय, गडचिरोली : ४७ केंद्रे
– उप प्रादेशिक व्यवस्थापक कार्यालय, अहेरी : ३३ केंद्रे
धान विक्रीत कोणतीही अडचण, विलंब किंवा तांत्रिक समस्या आढळल्यास शेतकऱ्यांनी संबंधित खरेदी विभागाशी अथवा केंद्रप्रमुखाशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांनी केले आहे.
जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना उचित दर आणि सुलभ प्रक्रिया मिळावी यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवली असून धान खरेदी हंगाम सुरळीत पार पडण्याच्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice













