१२ लाख रूपये बक्षीस असलेल्या नक्षली दाम्पत्याचे गडचिरोली पोलीसांसमोर आत्मसमर्पण

1242

– टीसीओसी कालावधीच्या पार्श्वभूमिवर पोलीस दलास मोठे यश

The गडविश्व
गडचिरोली :  टीसीओसी कालावधीच्या पार्श्वभूमिवर गडचिरोली दलास मोठे यश मिळाले आहे. नुकतेच १२ लाख रूपये असलेल्या नक्षली दाम्पत्याने गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्यासमोर आत्मसमर्पण केले आहे. कोलु उर्फ विकास उर्फ सुकांत विनोद पदा (२७)रा. वक्कुर पोस्टे कोयलीबेडा, ता. आरेच्छा जि. नारायणपूर (छ.ग) व राजे उर्फ डेबो जैराम उसेंडी (३०) रा. जवेली (बु) ता.एटापल्ली जि. गडचिरोली असे आत्मसमर्पीत नक्षल दाम्पत्याची नावे आहेत. आज १२ मे रोजी पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस अधिक्षक यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद पार पडली यावेळी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी आत्मसमर्पीत नक्षल दाम्पत्याचे पुष्पगुच्छ देवून सत्कार केले. महाराष्ट्र शासनाने कोलु पदा याचेवर ८ लाख तर राजे उसेंडी हिच्यावर ४ लाख रूपयाचे बक्षीस जाहीर केले होते.
शासनाने जाहीर केलेली आत्मसमर्पण योजना, वर्षभरात विविध चकमकीत माओवाद्यांचा झालेला खात्मा तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवदयांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत आत्मसमर्पण केले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे माओवादी मोठया संख्येने आत्मसमर्पण करीत आहे. त्याच पार्श्वभूमिवर सदर नक्षल दाम्पत्यांनी आत्मसर्पण केल्याचे पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी पत्रकार परिषदे दरम्यान सांगितले.

आत्मसमर्पित नक्षल दाम्पत्य

कोलु उर्फ विकास उर्फ सुकांत विनोद पदा हा सप्टेंबर २०१० मध्ये प्रतापपूर दलम सदस्य पदावर भरती झाला. नोव्हेंबर २०२२ ते सन २०१७ पर्यंत तो सीसीएम सुधाकरचा सुरक्षा गार्ड म्हणून कार्यरत होता. त्यानंतर जुलै २०१७ ते डिसेंबर २०२१ पर्यंत कंपनी क्रमांक १० मध्ये तो सेक्शन कमांडर पदावर कार्यरत होता. त्याच्यावर ३ खुन, ७ चकमक, १ दरोडा असे एकुण ११ गुन्हे दाखल आहेत. नक्षलमध्ये कार्यरत असतांना त्याने विविध ठिकाणी ३ ॲम्बुश लावले होते. त्याने लावलेल्या छत्तीसगडमधील अवालवरसे (छ.ग), महाराष्ट्रामधील झारेवाडा, पोयारकोठी, ॲम्बुशमध्ये व ओडीसामधील मौजा गुंडापूरी, कंजेनझरी, चुरामेट्टा या चकमकीमध्ये त्याचा सहभाग होता. त्याने लावलेल्या ॲम्बुशमध्ये सन- २०२० रोजी गडचिरोली जिल्ह्रातील पोमके कोठी हद्दीतील मौजा पोयारकोठी जंगल परिसरात १ पोलीस अधिकारी व १ पोलीस जवान शहीद झाले होते.
राजे ऊर्फ डेबो जैराम उसेंडी हि फेब्रुवारी २०११ मध्ये कसनसूर दलम सदस्य पदावर भरती झाली होती. सप्टेंबर २०१२ ते डिसेंबर २०२१ पर्यंत कंपनी क्र. १० मध्ये सदस्य पदावर कार्यरत होती. गडचिरोली जिल्ह्रातील पोमके कोठी हद्दीतील मौजा पोयारकोठी जंगल परिसरात लावलेल्या ॲम्बुशमध्ये १ पोलीस अधिकारी व १ पोलीस जवान शहीद झाले. तिच्यावर १ खून, ४ चकमक, १ जाळपोळ असे एकुण ६ गुन्हे दाखल आहेत. २०१९ रोजी मुसपर्शी येथील साईनाथ तव्वे या इसमाच्या खुनात तिचा सहभाग होता.
आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता शासनाकडुन कोलु पदा यास ३.५० लाख तर राजे उसेंडी हीला २.५० लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे. पती-पत्नीने एकत्रीत आत्मसमर्पणानंतर अतिरिक्त १.५० लाख असे एकुण ७.५० लाख रुपये तसेच शासनाच्या इतर योजनेचा लाभ मिळवुन देण्यात येणार आहे.
गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलविरोधी अभियान राबविल्यामुळे सन २०१९ ते २०२२ सालामध्ये आतापर्यंत एकुण ४७ जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून, सन २०२२ या चालु वर्षात एकुण ०२ जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. विकासकामांना आडकाठी निर्माण करणा­या नक्षलवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा असे आवाहन पोलीस अधीक्षक गडचिरोली अंकित गोयल साो. यांनी पत्रकार परिषदे दरम्यान केले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक समीर व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here