‘सर्च’ व गोंडवाना विद्यापीठाच्या ‘स्पार्क’ या नवीन अभ्यासक्रमाचा शुभारंभ

537

– ‘काळाची गरज असलेला व चाकोरी बाहेरील अभ्यासक्रम’ : कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

The गडविश्व
गडचिरोली, २८ जुलै : “स्पार्क” या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाचा उद्घाटन सोहळा नुकताच सोमवार २५ जुलै रोजी सर्च, शोधग्राम गडचिरोली येथे संपन्न झाला. स्व. ठाकूरदासजी बंग यांच्या समाधिला पुष्प अर्पण करून व त्यांना स्मरून या उद्घाटन सोहळ्याला सुरुवात झाली.
उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ‘सर्च’चे संचालक तथा स्पार्क अभ्यासक्रम समितीचे अध्यक्ष डॉ. अभय बंग हे होते, प्रमुख अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, तसेच सर्च संस्थेच्या सहसंचालिका डॉ. राणी बंग उपस्थित होत्या. तसेच या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेले सर्व पदव्युत्तर विद्यार्थी यावेळी हजर होते. यांच्यासह गोंडवाना विद्यापीठाचे डॉ. मनीष उत्तरवार, डॉ. राजीव वेगिनवार, डॉ. चंद्रमौली, सर्चचे सहसंचालक तुषार खोरगडे, मुक्तिपथचे संचालक तपोजे मुखर्जी, उपसंचालक संतोष सावळकर, मुक्तिपथ तालुका संघटक, सर्च मधील विविध विभागाचे प्रमुख व पदाधिकारी सुद्धा यावेळी उपस्थित होते.
स्पार्क अभ्यासक्रमाचे उद्घाटन होऊन अभ्यासक्रम रीतसर सुरु झाला आहे अशी घोषणा यावेळी अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांचे कडून करण्यात आली. अभ्यासक्रमासाठी तयार करण्यात आलेल्या मोड्यूल्सचे अनावरण केले व उपस्थितांना संबोधित करण्यात आले. आपल्या मार्गदर्शनात बोलतांना स्पार्क अभ्यासक्रम हा चाकोरी बाहेरील शिक्षण देणारा व माणूस म्हणून समृद्ध करणारा असेल व काळाची गरज असलेला अभ्यासक्रम आहे असे गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे म्हणाले. हे पहिले वर्ष असून यशस्वीरित्या हा अभ्यासक्रम पुढे सुरु राहील असेही ते म्हणाले. हा नयी तालीम वर आधारित प्रत्यक्ष काम, शिक्षण व कमाई या त्रिसुत्रीवर आधारित, व प्रत्यक्ष कर्म करून ‘अनुभवातून शिका’ हा आधार असलेला अनोखा अभ्यासक्रम आहे असे डॉ. अभय बंग म्हणाले व ज्यांनी यासाठी प्रवेश घेतला त्यांचे अभिनंदन त्यांनी केले. डॉ. राणी बंग यांनी गडचिरोली जिल्हा दारूबंदी चळवळ ते सुरु असलेले जिल्हाव्यापी मुक्तिपथ अभियाना पर्यंतच्या कामाचा प्रवास थोडक्यात सांगत, व्यसनाच्या विषयावरील काम पुढे नेणारा हा अभ्यासक्रम आहे असे म्हणत यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
हा अभ्यासक्रम शिकतांना ‘मुक्तीपथ’ अभियानात कामाच्या विविध नव्या संधी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार आहे. कृती सोबत ज्ञान आणि कौशल्याची जोड हि विशेषत: या अभ्यासक्रमाची आहे. समाजकार्यामध्ये किवा इतर कोणत्याही शाखेतून पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची व्यसनावर काम करण्यासाठी प्रत्यक्ष काम करता करता क्षमता व कौशल्य वाढवणे हा या अभ्यासक्रमाचा उद्देश आहे. पहिल्या वर्षीच्या सत्रासाठी एकूण १४ उमेदवारांनी विद्यापीठाची आवश्यक फी करून या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेला आहे. २५ ते ३० जुलै असा एक आठवडा यांचे सर्च येथे तज्ञ व्यक्तीद्वारा प्रशिक्षण होणार असून १ ऑगस्ट पासून प्रत्यक्ष तालुक्याच्या ठिकाणी जाऊन शिक्षण व कामाला सुरुवात केली जाईल.
‘स्पार्क’ या पदव्युत्तर डिप्लोमाचे शैक्षणिक संयोजक ‘सर्च’चे सहसंचालक तुषार खोरगडे असून, या वर्षभरात ‘सर्च’ व ‘मुक्तिपथ’ आणि ‘गोंडवाना विद्यापिठातील’ तज्ञाद्वारा या अभ्यासक्रमात मार्गदर्शन लाभणार आहे.
या कार्यक्रमाच्या शेवटी अभ्यासक्रम पूर्ततेचा संकल्प घेत, हे नम्रता के सम्राट हे महात्मा गांधी यांनी लिहलेली प्रार्थना घेऊन उद्घाटन सोहळ्याची सांगता करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here