वैनगंगा नदी पुलावर भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडले

692

– अपघातात काकू-पुतण्याचा मृत्यू, तर सून गंभीर जखमी, शेतावर जात असतांना झाला अपघात
The गडविश्व
भंडारा : जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीवरील पुलावर भरधाव ट्रेलरने दुचाकीला चिरडल्याचा अपघात सोमवार २८ मार्च रोजी सकाळच्या सुमारास झाला. या अपघातात काकू-पुतण्याचा मृत्यू, तर सून गंभीर जखमी झाली आहे.
हा अपघात भंडारा शहरालगत वैनगंगा नदीच्या मोठ्या पुलावर घडला.
सुशिला मुरलीधर कागदे (६०), विष्णू लक्ष्मण कागदे (४५) असे मृत काकू-पुतण्याचे नाव आहे तर सुनीता विष्णू कागदे (३५) असे जखमीचे नाव आहे. तिघेही भंडारा तालुक्यातील मालीपार चांदोरी येथील रहिवासी आहेत. सोमवारी सकाळी तिघेही चांदोरी मालीपार येथून एमएच ३५ सी ८१८७ क्रमांकाच्या दुचाकीने भंडारा लगतच्या कोरंबी येथे हरभरा कापणीसाठी जात होते. एकाच दुचाकीवर तीघे जण प्रवास करीत असताना वैनगंगा नदीच्या पुलावर मागून आलेल्या केए ०१ एजी ८७६१ क्रमांकाच्या ट्रेलरने दुचाकीला धडक दिली. धडक एवढी जबर होती की या धडकेत तिघेही चाकाखाली आले. सुशिला कागदे यांचा जागीच मृत्यू झाला. विष्णू आणि सुनीता गंभीर जखमी झाले. यावेळी जखमींना तत्काळ भंडाराच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने दोघांनाही नागपूर येथे रवाना करण्यात आले. विष्णूचा नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर सुनीतावर उपचार सुरू आहे. मात्र, तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते. विष्णूच्या मागे दोन मुली, दोन मुले आहे. सुशिलाच्या मागे पती व एक मुलगा आहे. अपघातानंतर जिल्हा वाहतूक शाखा, कारधा पोलिसांनी धाव घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here