महाराष्ट्र राज्य हंगामी क्षेत्र कर्मचारी संघटनेच्या वतीने आझाद मैदानावर साखळी उपोषण

379

The गडविश्व
गडचिरोली : मुंबई येथील आझाद मैदानावर विविध मागण्यांकरिता महाराष्ट्र राज्य हंगामी क्षेत्र कर्मचारी संघटनेच्या वतीने आज पासून साखळी उपोषणाला बसले आहे. गडचिरोली येथून साखळी उपोषणासाठी गडचिरोली वरून हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांचा पहिला समूह रवाना झाले असून उपोषणाचा पहिला दिवस पार पडला. या समूहात १६ सदस्य आहेत. उपोषणाचे नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य राशिद शेख करत असून उपाध्यक्ष ज्ञानदिप गलबले, सचिव मिलिंद खेवले, कोषाध्यक्ष सुरज बबनवाडे, विकेश सातपुते, चेतन जेंगठे, ज्ञानेश्वर कांबळे, अमित कुकडकर,मनोज सिडाम, निहाल जेट्टिवार, हेमचंद्र पातेवार, राजेश धुपम, प्रदिप दुर्गे, महेश चौधरी, प्रेमसागर जाबोर, हितेश दुर्गे, मयुर देवतळे या सदस्यांचा समावेश आहे.
आरोग्य शासनाच्या अखत्यारित हिवताप विभागांतर्गत कार्यरत हंगामी क्षेत्र कर्मचारी यांच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात हे उपोषण करण्यात येत आहे. वर्षानुवर्षांपासून आरोग्यसेवेसाठी झटणाऱ्या कर्मचाऱ्यांवर २९ सप्टेंबर २०२१ च्या अधिसूचनेतील बदललेल्या सेवाप्रवेश नियमांमुळे अन्याय झाला आहे. ऐन परीक्षेच्या व नियुक्त्यांचा काळात नियम बदलल्यामुळे सर्वांची सरकारी नोकरीवर दावेदारी संपुष्टात आली आहे. तसेच कार्यरत कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीत देखील अडथळा निर्माण झाला आहे. ५० टक्के राखीव कोटा रद्द झाला आहे. उमेदवार ३० वर्षा पेक्षा जास्त नसावा ही अट घातली गेली आहे. बारावी सायन्स पास, स्वच्छता निरीक्षक चा डिप्लोमा पास, १८० दिवसाचे कामाचे अनुभव प्रमाणपत्र, या अटींची पूर्तता ऐन वेळेवर करणे अशक्य आहे. म्हणून ही अधिसूचना रद्द करण्यात यावी तसेच सेवाप्रवेश नियम पूर्ववत ठेवावे. यासाठी हा लढा आहे. सध्या सुरू असलेल्या आरोग्य भरतीत बहुतांश जिल्ह्यात ईडब्ल्यूएस ,माजी सैनिक, अंशकालीन, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त ह्या जागा उमेदवार न मिळाल्याने रिक्त असून त्या अगेन्स्ट कोट्यातून तात्काळ भरल्या जाव्यात. जिल्हा परिषद पदभरती सोबत गट ‘क’ व ‘ड’ ची परीक्षा लवकरात लवकर द्यावी. २८ फेब्रुवारी २०२१ च्या पेपर मधील उमेदवारामधूनच उर्वरित ५० टक्के उमेदवार गुणवत्तेनुसार घेऊन १०० टक्के पदभरती पूर्ण करावी. महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात पात्र उमेदवार न मिळाल्यामुळे रिक्त असलेल्या जागेवर गडचिरोली जिल्ह्यातील बहुसंख्य ९० गुण घेऊन पात्र असणाऱ्या उमेदवारांना नियुक्ती द्यावी. या मागण्यांसाठी जिल्ह्यात निवेदने देण्यात आली असून सत्र सुरू असताना मुंबईत उपोषण करून मागण्या पूर्ण करण्याचे प्रयत्न संघटनेकडून केले जाणार आहे. जिल्ह्यातील जनप्रतिनिधीनी सभागृहात प्रश्न विचारून, या मुद्याला लक्षवेधी व तारांकित करून समस्या सोडवावी व जिल्ह्यातील युवकांचा पोटापाण्याचा प्रश्न दूर करावा. गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त, अभावग्रस्त असल्याने या ठिकाणी रोजगाराची साधने उपलब्ध नसून जिल्ह्यात कारखाने नसल्यामुळे रोजगाराच्या अनेक समस्या आहेत. महाराष्ट्रातील ७५ टक्के मलेरियाचे रुग्ण एकट्या गडचिरोली जिल्ह्यात असल्याने या जिल्ह्यातील विभागांतर्गत येणाऱ्या आरोग्य सेवकाचे रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावीत. ह्या सर्व मागण्यांसाठी साखळी उपोषण करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here