गडचिरोली शहरातील नागरिकांना दुषीत पाण्याचा पुरवठा : नगर परिषदेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

653

– शेतकरी कामगार पक्षाची मागणी

The गडविश्व
गडचिरोली : सुरक्षेच्या भोंगळ कारभारामुळे विवेकानंद नगरातील पाण्याच्या टाकीत बुडून युवकाचा मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह पाईपलाईन मध्ये आढळून आला. यामुळे शहरवासीयांना दूषित पाणी बळजबरीने प्यावे लागले आहे, तसेच सदर प्रकाराची किळस येवून काल संध्याकाळपासून अनेकांना उलटी, मळमळीचा त्रास होत आहे. याला स्थानिक नगर परिषदेची मुजोर प्रशासकीय यंत्रणा जबाबदार असून नगर परिषदेवर सुरक्षेअभावी मृत्यू होणे आणि दुषीत पाण्याचा पुरवठा केल्याबद्दल मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे शहर चिटणीस भाई देवेंद्र चिमनकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात भाई देवेंद्र चिमनकर यांनी म्हटले आहे की, शहरातील पाण्याच्या सर्व टाक्यांना आणि पाईप लाईनची देखभाल आणि सुरक्षेची काळजी घेणे अत्याआवश्यक असतांनाही नगर परिषदेने त्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले.त्यामुळे पाण्याच्या टाक्यांवर कोणालाही चढता येते. अनेक टाक्यांची झाकणं आणि जाळ्यांची तुटफुट झालेली असल्याने नेहमीच नळाच्या पाण्यात पक्षी आणि छोटे जनावर पाण्यात पडून ते दुर्गंधीयुक्त पाणी नागरिकांना प्यावे लागते. पाणीपुरवठ्याच्या नावाखाली आलेला कोट्यवधी रुपयांचा निधी नगर परिषदेने आजवरी कोणतेही ठोस काम न करताच जिरवला असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचा आरोप भाई देवेंद्र चिमनकर यांनी केला आहे.
अशाच पध्दतीने शेकडो कोटींच्या भुमीगत नाल्यांचीही अवस्था होणार असून नगर परिषदेने नागरिकांच्या जिवाशी खेळ मांडला आहे.सदरच्या प्रकारचा निषेध करण्यासाठी लवकरच नगर परिषदेवर शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, जयश्री वेळदा,भाई शामसुंदर उराडे,भाई अक्षय कोसनकर यांच्या नेतृत्वात निषेध मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशाराही शहर चिटणीस भाई देवेंद्र चिमनकर यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here