गडचिरोली शहरातील अवैध दारूविक्री बंद करा

299

– महिला व सामाजिक कार्यकर्त्याचे नगरप्रशासनाला निवेदन
The गडविश्व
गडचिरोली : शहरातील काही वार्डात सुरु असलेली अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी नगरपरिषदेने पुढाकार घ्यावा, अशी मागणी शहरातील महिला, सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन नगरपरिषदेला सादर करण्यात आले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात गेल्या २९ वर्षापासून दारूबंदी आहे. दारूबंदी जनतेच्या हिताची आहे. मात्र, शहरातील रामनगर, लांझेडा, गोकुळनगर, फुले वॉर्ड आदी वार्डात अवैध दारूविक्री सुरु आहे. त्यामुळे शहरातील अवैध दारूविक्री बंद करून दारूबंदी अधिक मजबूत करणे आवश्यक आहे. यासाठी नगरप्रशासनाने नगर दारूमुक्तीचा प्रस्ताव पारित करून दारूबंदीच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन व पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा करावा. नगरसेवकांच्या मदतीने प्रत्येक वार्डात दारू व्यसनींच्या उपचारासाठी व्यसन उपचार क्लिनिकचे आयोजन करण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदन देताना जिल्हा दारूबंदी समितीचे सदस्य विलास निंबोरकर, सामाजिक कार्यकर्ते मनोहर हेपट, लताताई ढोक, अंनिस सदस्य राकेश रत्नावार, सामाजिक कार्यकर्ता शुभांगी रामटेके, लांजेडा दारूबंदी संघटनेच्या अध्यक्ष शशिकला मडावी, अर्चना रत्नावार, सुवर्णा गेडाम, हेमा रत्नावार, रामनगर शहर संघटनेच्या अध्यक्ष किरण मशाखेत्री, तालुका संघटक अमोल वाकुडकर, उपसंघटक रेवनाथ मेश्राम आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here