गडचिरोली : नवमतदारांना ओळखपत्राचे वाटप व मतदानात चांगली कामगीरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान

167

– लोकशाहीला सुदृढ करण्यासाठी मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय मीणा यांचे मतदारांना आवाहन

The गडविश्व
गडचिरोली : संविधानाने नागरिक म्हणून वय वर्षे 18 पुर्ण झाल्यावर मतदानाचा अधिकार प्रत्येकाला दिला आहे, तो वापरून आपल्या लोकशाहीला अधिक सुदृढ करण्यासाठी मतदान करा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय मीणा यांनी केले. राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्ययासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी संजय मीणा यांनी मतदारांना राष्ट्रीय मतदार दिवसाच्या शुभेच्छा दिल्या व उपस्थितांच्याबरोबर मतदान करणेबाबत शपथ घेतली. यावेळी ते म्हणाले, संविधानात उद्देशिकेची सुरूवातच आम्ही भारताचे नागरिक या वाक्याने होते. म्हणजेच नागरिक जो की मतदार आहे, त्याला देशाचे सरकार निवडण्याचा अधिकार दिला आहे. यावरून त्यांनी आपल्या भाषणात मतदारांचे महत्त्व विशद केले. मतदान प्रक्रिया ही आपल्या देशात एक मोठा उत्सव म्हणून पार पाडली जाते. त्या प्रक्रियेत मतदान करून आपला सहभाग सर्वांनी नोंदविणे आवश्यक आहे. मतदानादिवशी सुट्टी असते म्हणून कित्येक जण बाहेर फिरायला जातात. परंतू जर सर्वांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला तर आपण आपल्या निवडीचे शासन निवडू शकतो. यामुळेच खऱ्या अर्थाने लोकशाहीला आपण अधिक मजबूत बनवू असे त्यांनी यावेळी मत व्यक्त केले.
राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला जिल्हाधिकारी संजय मीणा यांचेसह मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, प्रभारी अति.जिल्हाधिकारी धनाजी पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे, तहसिलदार गडचिरोली महेंद्र गणवीर तसेच इतर विभागातील प्रमुख, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मतदारांना मतदानाचा मुलभूत अधिकार वापरण्यासाठी आवाहन केले. तसेच मतदान प्रक्रियेत सहभागी अधिकारी कर्मचारी यांना मतदान ही राष्ट्रीय कार्य म्हणून जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडण्याचे आवाहन केले. अति.जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांनी मतदारांना येणाऱ्या जिल्हा परिषद, नगरपालिका तसेच लोकसभा- विधानसभा निवडणूकांमध्ये निर्भिडपणे मतदान करावे असे आवाहन केले. उप जिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे यांनी प्रास्ताविक करताना जिल्हयातील मतदारांविषयी माहिती दिली व मतदार दिनाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन देवेंद्र दहिकर यांनी केले. आभार तहसिलदार महेंद्र गणवीर यांनी मानले.

नवमतदारांना ओळखपत्राचे वाटप – जिल्हयातील मतदार यादीत यावेळी 18 हजार 602 नव्या मतदारांची नोंदणी झाली. त्यातील 9996 मतदार हे 18,19 वयाचे आहेत. ते पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. त्यापैकी निवडक चार जणांना आजच्या कार्यक्रमात ओळखपत्र वाटप करून पुष्पगुच्छ देण्यात आले. यामध्ये आदित्य संगीडवार, रीतीक श्रीकृष्ण वाटकर, गायत्री हमसे व साक्षी दहेलकर यांचा समावेश होता.

मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना प्रशस्तिपत्रकाचे वाटप : निवडणूक प्रक्रिया बळकट करण्याकरीता मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचे योगदान बहुमूल्य आहे. यातील निवडक प्रातिनिधीक स्वरूपात त्यांचा सन्मान या कार्यक्रमात करण्यात आला. यात जी.डब्लू. किरणापूरे, डार्ली, महेश डोंगरवार, डोंगरमेंढा, ममता ढवळे, कढोली, माया ढेंगरे, चुरचुरा माल, एस.डी.बन्सोड, गडचिरोली, वासुदेव कोडापे, पेरमिली, लक्ष्मीस्वामी चेडे, सिरोंचा यांचा प्रशस्तिपत्र व पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here