गडचिरोलीत माओवादमुक्त भारताच्या वाटचालीवर माध्यम परिषद; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह तज्ज्ञांचा संवाद
– २१४ शहीद जवानांना अभिवादन; माओवादोत्तर काळातील आव्हाने आणि विकासाच्या दिशेवर विचारमंथन
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०५ : जिल्ह्यातील माओवादी चळवळीचा प्रभाव संपुष्टात आल्याच्या पार्श्वभूमीवर माओवादविरोधी संघर्षाचा प्रवास, सुरक्षा यंत्रणांचे योगदान आणि भविष्यातील आव्हानांवर चर्चा करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने पत्रकारांसाठी विशेष वार्तालाप माध्यम परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि माओवाद विषयातील अभ्यासकांनी पत्रकारांशी संवाद साधत जिल्ह्यातील माओवादाची सद्यस्थिती आणि आगामी वाटचालीवर विचार मांडले.
गडचिरोली पोलीस दल आणि भारत सरकारच्या पत्र व माहिती कार्यालय, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ४ नोव्हेंबर रोजी पोलीस मुख्यालयातील एकलव्य हॉल येथे ‘माओवादमुक्त भारत’ या विषयावर ही परिषद पार पडली. विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदीप पाटील यांनी आभासी माध्यमातून सहभाग घेतला. तर पोलीस उपमहानिरीक्षक योगेश कुमार आणि पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
परिषदेत माओवादाची उत्पत्ती, विस्तार, विचारसरणी, कार्यपद्धती आणि माओवादविरोधी अभियानादरम्यान आलेली आव्हाने यावर सविस्तर चर्चा झाली. सशस्त्र माओवादाच्या प्रभावानंतर पोलीस दलासमोर निर्माण होणारी भविष्यातील आव्हाने आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांवर संदीप पाटील यांनी मार्गदर्शन केले.
ज्येष्ठ लेखक व धोरण विश्लेषक पी. व्ही. रामना आणि ज्येष्ठ पत्रकार कार्तिक लोखंडे यांनीही आपल्या अभ्यासपूर्ण निरीक्षणांतून माओवादविरोधी संघर्षाचे विविध पैलू मांडले. या संघर्षात पोलीस दलाने अवलंबलेल्या रणनीती, सुरक्षा यंत्रणांचे योगदान, स्थानिक नागरिकांचा सहभाग आणि विकासात्मक उपक्रमांची भूमिका यावर यावेळी प्रकाश टाकण्यात आला.
माओवादाची समस्या केवळ कायदा व सुव्यवस्थेपुरती मर्यादित नसून तिच्याकडे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि विकासात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी पोलीस दल, शासन, माध्यमे आणि समाजातील विविध घटकांमध्ये समन्वय व सकारात्मक संवाद आवश्यक असल्याचेही अधोरेखित करण्यात आले. पत्रकारांनी विविध प्रश्न उपस्थित करून चर्चेत सहभाग घेतला.
या परिषदेत माओवादविरोधी अभियानात प्राणांची आहुती देणाऱ्या २१४ शहीद जवानांना अभिवादन करून त्यांच्या बलिदानाचे स्मरण करण्यात आले.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., भारत सरकारच्या पत्र व माहिती कार्यालयाचे सौरभ खेकडे व देवप्रकाश दुबे यांच्यासह जिल्ह्यातील पत्रकार बांधव उपस्थित होते.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #MaoismFreeIndia #GadchiroliPolice #MaoistFreeGadchiroli #MaharashtraPolice #AntiNaxalOperation #MediaConference #Maoism #TributeToMartyrs #GadchiroliNews













