-विद्यार्थ्यांनी मांडले उपयुक्त विचार
The गडविश्व
सावली : स्थानिक विश्वशांती कनिष्ठ महाविद्यालयात येथील प्रा.आर.केदार यांनी ‘या’ कालवाधीमध्ये ‘शाळा-महाविद्यालये बंद असावी की चालू’ या विषयावर विचार मंथन करून विद्यार्थ्यांची मते जाणून घेतली. या विचार मंथन विषयात अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेत अतिशय सुंदर व उपयुक्त विचार मांडले.
वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने शाळा कॉलेज बंद ठेवण्याचे आदेश दिले. यामुळे राज्यातील शाळा कॉलेजांना पुन्हा कुलूप लागले व पुन्हा ऑनलाईन शिक्षण सुरु करण्यात आले आहे. मात्र ज्या भागात कोरोनाचा प्रादुभाव कमी प्रमाणात आहे त्या भागात शाळा कॉलेज बंद करू नये असे अनेक स्तरातून मागणी होत आहे. तसेच विद्यार्थ्यांनी सुद्धा शाळा कॉलेज बंद करण्याच्या शासनाच्या निर्णयास विरोध दर्शविला आहे.
हि बाब लक्षात घेता विश्वशांती कनिष्ठ महाविद्यालय सावली येथील प्रा.आर.केदार यांनी ‘या’ कालवाधीमध्ये ‘शाळा-महाविद्यालये बंद असावी की चालू’ या विषयावर विद्यालयात विचार मंथन करून विद्यार्थ्यांची मते जाणून घेतली. या विचार मंथनात अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेत अतिशय सुंदर व उपयुक्त विचार मांडले.
विचार मंथनात मानसी नायबकार, आचल मेश्राम, सुशांत शिंदे, स्वाती सिरस्कर, पौर्णिमा येडमलवार, प्राजक्ता चौधरी, अतुल राऊत, संदेश नर्मलवार, जयश्री चांदेकर, काजल भोयर इत्यादी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांची मते
-
या कालावधित महाविद्यालय ही बंद आहेत हे योग्यच. परंतु यामुळे वर्ग दहावी आणि बारावी वर्गाच्या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शाळा- महाविद्यालय बंदच आहे तर अभ्या कशाला करायचा ? परीक्षा तर होणार नाही अशी विद्यार्थ्यांमध्ये भावना तयार होत आहे. या कालावधीत दहावी आणि बारावीचे वर्ग सुरु असले पाहिजेत. शाळा महाविद्यालय नियमित सुरु असल्यास अभ्यास नियमित राहणार. – कु आचल प्रकाश मेश्राम ( वर्ग 12वी )
-
महाविद्यालय नेहमी प्रमाणे सुरु राहावे. विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझर, सामाजिक अंतर ची अट शिथिल करून वर्गामध्ये प्रवेश द्यावा. एका वर्गात जास्त विद्यार्थी असल्यास दोन गट तयार करून एक दिवसाआड वर्ग भरवावे.असे केल्यास महाविद्यालय नियमित सुरु राहील.
– स्वाती सुनिल सिरस्कर
-
एक महिन्याच्या कालावधीत शाळा महाविद्यालय बंद असल्यास विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुसकान होणार. यामुळे प्रत्येक आठवड्यात एक दिवसाआड वर्ग भरवावेत त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. ऑनलाईन पद्धतीचे शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्यांना समजेलच असे नाही.
-अतुल राऊत ( वर्ग 11 )
-
शालेय जीवनाचा काळ हा खऱ्या अर्थाने आयुष्याला आकार देणारा असतो. शाळेत विद्यार्थी घडत असतो, मुलांच्या विचारांना ,स्वप्नांना पंख फुटतात ते शालेय परिसरातच.गत वर्षांत कारोना महामारीने शाळा ,कॉलेज बंद झाले. मुलांना शालेय जीवनापासून वंचित राहावे लागले बघता बघता २-३ वर्ष निघून गेली शाळा ,कॉलेज बंद आहेत .बस आता खूप झाले आता पुन्हा किती काळ आपण या भीतीने जगायचं जीवन मिळाले तर मरण सुद्धा येणारच .किती वर्ष आपण असेच जगायचं? शालेय जीवनापासून खूप मुले वंचित राहिले आहेत .विद्यार्थी शाळे विना पोरका होत चालला आहे.काही निर्बंध लावले..यामुळे शाळा आणि महाविद्यालये सुद्धा बंद करण्यात आली आहेत. येत्या दोन महिन्यातच १०-१२वी ची परीक्षा आहे. तसे वेळापत्रक सुद्धा जाहीर करण्यात आले आहे. पण कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारने काही निर्बंध लावले. विद्यार्थ्यांना नुकतीच ६-७ महिन्यापासून लागलेली शिक्षणाची ओढ यात कुठंतरी हराऊन जाईल असे मला वाटते कारण याच्या आधी सुद्धा लॉकडाऊनची स्थिती भारतात होती .१० वी आणि १२वी ही विद्यार्थ्यांच्या जीवनातली यशाची पायरी समजली जाते .परंतु जितकी १०-१२वी महत्वाची तेवढाच पहिला वर्ग सुद्धा महत्वाचा असतो कारण इथूनच विद्यार्थी घडत असतो. जर इमारतीचा पायाच जर मजबूत नसेल तर ती इमारत पडण्याची शक्यता असतेच .म्हणून विद्यार्थ्यांना योग्य तो मार्गदर्शन, शिस्त ,ओढ लगावी, शाळा आणि विद्यार्थ्यांमधील असलेला जिव्हाळा कायम ठेवायला शाळा आणि कॉलेज सुरू राहावे असे मला वाटते.–
जयश्री मोतीराम चांदेकर (वर्ग १२ वी)
-
संपूर्ण जनतेचा विचार करून निर्बंध लावण्यात आले. मात्र त्यात शालेय विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. जी मुले पहिल्या वर्गात जात होती. त्यांना आपल्या शाळेचा पहिला दिवस अनुभवता आला नाही. आणि अशा कोरोनामुळे त्यांच्या जीवनातील अविस्मरणीय प्रसंगाचा आस्वाद घेता आला नाही.
– मानसी नायबनकार
-
नियमित महाविद्यालय सुरु असल्यास विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष राहील. सध्याची परिस्थिती बघता परीक्षा ऑनलाईन होणार या भ्रमात विद्यार्थी राहून अभ्यासापासून आणि पुस्तकांपासून विद्यार्थी दूर चालला आहे. शाळा -महाविद्यालये बंद असल्यास विद्यार्थी वाईट मार्गाकडे जाण्याची शक्यता असते. त्यामुळे शाळा महाविद्यालये सुरु राहावीत.
– प्राजक्ता चौधरी ( वर्ग १२ वी )