– आरमोरीतील विविध गावांमध्ये उपक्रम
The गडविश्व
गडचिरोली २० ऑक्टोबर : आरमोरी तालुक्यातील भाकरोंडी, इंजेवारी, तुलतुली, परसवाडी या गावांमध्ये गाव संघटनेच्या वतीने मुक्तिपथ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या माध्यमातून एकूण १२९ स्पर्धकांनी सहभाग घेत गावातील अवैध दारूविक्री विरोधात लढा उभारण्यासाठी एकी दाखवली आहे. या चारही गावात मोठ्या उत्साहाने गावातील सदस्यांनी स्पर्धेत भाग घेतला व स्पर्धा बघण्यासाठी गावातील लोकांनी गर्दी केली होती. या निमित्ताने एकत्र जमलेले खेळाडू व उपस्थित प्रेक्षक यांना सुरुवातीला दारू व तंबाखू सेवन करनार नाही याबाबत संकल्प देण्यात आला. गावात अवैध दारू व तंबाखू विक्री सुरु आहे कि, बंद आहे यावर चर्चा करत, विक्री बंद करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन कृती केली पाहिजे, याबाबत आरमोरी तालुका संघटक श्री विनोद कोहपरे व सहकारी पल्लवी मेश्राम, सुषमा वासनिक यांनी समजून सांगितले.
भाकरोंडी येथील स्पर्धेत ४१ जणांनी सहभाग घेतला होता. यामध्ये दिगांबर राऊत, मेघा ढवळे, विशाखा नेवारे, गौरव शेंदरे या स्पर्धकांनी विविध गटांतून प्रथम येण्याचा मान मिळविला. यावेळी ग्रापं सरपंच विलास उसेंडी, ग्रामसेवक बनसोड, तंमुस अध्यक्ष देवराज सहारे, पोलिस पाटील लालाजी उसेंडी, उपसरपंच दिगांबर राऊत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. इंजेवारी येथील स्पर्धेत ३८ महिला, पुरुष व युवक-युवतींनी सहभाग दर्शविला होता. यावेळी वासुदेव मांदाडे, उर्मिला पात्रीकर, योगेंद्र चिचघरे, गीता गौरकार या चार स्पर्धकांनी अव्वल क्रमांक पटकाविला. विजेत्या स्पर्धकांना सरपंच अल्का कुकडकार व पोलिस पाटील लता खांडकुरे यांच्याहस्ते गौरविण्यात आला.
तुलतुली येथील स्पर्धेतून २४ स्पर्धकांनी दौड लावली. यामध्ये शामसुंदर जाळे, पिंकी नरोटे, अमित हिचामी, सुगंधा कुमोटी या स्पर्धकांनी यश प्राप्त केले. यावेळी मुख्याध्यापक बाळकृष्ण ढोरे, शाव्यसचे घनश्याम कोल्हे, इंद्रजित जाळे यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते. परसवाडी येथे घेण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेतून २६ स्पर्धकांनी शक्तिप्रदर्शन केले. यात प्रकाश हलामी, अर्चना किरंगे, रोहित किरंगे व पिंगला किरंगे या स्पर्धकांनी सुयश प्राप्त केले. यावेळी सरपंच प्रदीप कुमरे व गावातील नागरिक उपस्थित होते.
