महावाडा येथे बुध्द विहाराचे उद्घाटन उत्साहात संपन्न

587

– विहारात वाचनालयाचीही स्थापना
The गडविश्व
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील महावाडा (मोहली) येथील बौध्द समाजाने नव्यानेच बांधलेल्या संबोधि बुध्दविहाराचे उद्घाटन रविवार २० मार्च रोजी उत्साहपुर्ण वातावरणात संपन्न झाले.
अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रविण उर्फ बाळासाहेब खोब्रागडे यांच्या हस्ते विहाराचे उद्घाटन करण्यात आले. तसेच यावेळी रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते. तर जेष्ठ रिपब्लिकन नेते मारोतराव कांबळे हे विशेष अतिथी म्हणुन उपस्थित होते.
तसेच बुध्द विहारात महावाडा येथील रहिवासी पोलिस निरीक्षक प्रशांत साखरे यांनी पुढाकार घेऊन सुरू केलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे उद्घाटन सुध्दा पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
भन्ते डॉ.धम्मसेवक, भन्ते धम्मज्योती व भन्ते सोन यांच्या हस्ते बुध्द मुर्तीची प्रतिष्ठापणा करून बुध्दवंदना घेण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुणे जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, रिपब्लिकन नेते अशोक निमगडे, कुलपती मेश्राम, प्राचार्य प्रकाश दुधे, भारतीय बौध्द महासभेचे जिल्हाध्यक्ष तुलाराम राऊत, बसपाचे प्रदेश सचिव रमेश मडावी, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.दिलीप बारसागडे, प्रा.गौतम डांगे, धर्माजी बांबोळे, हंसराज उंदिरवाडे, धर्मानंद मेश्राम, सुरेखाताई बारसागडे, शंकर बोरकुट, सरपंचा तनुजा तुलावी, पोलिस पाटील छाया मशाखेत्री इत्यादी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना बाळासाहेब खोब्रागडे यांनी तथागत गौतम बुध्दांच्या धम्माची शिकवण ही संपुर्ण मावजातीसाठी अत्यंत उपयुक्त असुन समाजाच्या कल्याणासाठी व जागतिक शांततेसाठी ती आजही आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. महावाडा सारख्या दुर्गम भागातील लहानशा गावात बौध्द समाजाच्या नागरिकांनी हे बुध्द विहार उभे केल्याबद्दल त्यांनी समाज बांधवांचे अभिनंदनही केले.
मारोतराव कांबळे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जिवनातील महत्वपुर्ण घडामोडींचा उल्लेख करून आंबेडकरी आंदोलन व बौध्द धम्माची चळवळ पुन्हा वेगाने पुढे नेण्याची गरज असल्याचे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात रोहिदास राऊत यांनी संपुर्ण गावकऱ्यांना धन्यवाद देऊन या गावातील सामाजिक सलोखा पुन्हा रूध्दींगत होईल असा विश्वास व्यक्त केला.
प्रारंभी बाळासाहेब खोब्रागडे यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करून समता सैनिक दलाची मानवंदना देण्यात आली व गावातुन भव्य मिरवणुक काढण्यात आली. गावातील बिरसा मुंडा स्मारकाजवळ यावेळी पाहुण्यांच्या हस्ते बिरसा मुंडांच्या पुतळ्याला पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंचशील समाज मंडळाचे सचिव अनिल साखरे, प्रास्ताविक प्रमोद मशाखेत्री व आभार राहुल राऊत यांनी केले.
या कार्यक्रमात महावाडा येथील दानदात्या कर्मचारी अधिकाऱ्यांचा शॉल व पुष्पगुच्छ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. रात्री प्रबुध्द हो मानवा हा बुध्द भिम गितांचा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला. याप्रसंगी गावातील मुलींनी आकर्षक नृत्य सुध्दा सादर करून आपल्यातील कलागुणांचे प्रदर्शन केले.
या कार्यक्रमाला, जगन जांभुळकर, भीमराव भैसारे, रमेश बारसागडे, दुर्योधन सहारे, पुणेेश्वर वड्डे, दिलीप मशाखेत्री, केवलराम मशाखेत्री आणि महावाडा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंचशील समाज मंडळ व त्रिशरण महिला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here