धानोरा तालुक्यातिल आधारभूत खरेदी केंद्र बंद, शेतकऱ्यांचे धान्य बाजारात

436

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ६ नोव्हेंबर : तालुक्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतले. धानाला योग्य भाव मिळण्यासाठी सर्वच शेतकरी खरेदी केंद्र च्या प्रतीक्षेत असताना खरेदी केंद्र सुरू न झाल्याने खाजगी व्यापाऱ्यांना अतिशय कमी दरात धान्य विक्री करावे लागत असल्याने शासनाप्रती शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
दरवर्षी शेतकऱ्यांना धानाचे योग्य भाव शेतकऱ्यांना मिळत नाही. खरेदि केंद्राचा सगळ्यात जास्त फायदा शेतकऱ्यांना होत असल्याने आधारभूत खरेदी केंद्र व्यापारासाठीच आहेत का ? असा प्रश्न शेतकरी विचारीत आहे. आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू होण्यासाठी सरकार उशिर करित आहे कि शासनच उदासिन आहे हेच येथील शेतकऱ्यांना कळत नाही. सततच्या पावसाने आधीच नुकसान झाले आहे. अनेक शेतकरी नेस्तनाभुत झाले त्यातच आता विलंब. शेतकऱ्यांची परिक्षा शासनच घेतो काय असे वाटायला लागत आहे. नक्षलग्रस्त धानोरा तालुक्यात सिंचनाची सोय नाही, येथील शेती निसर्गाच्या पावसावर अवलंबून असते, पाणी कधि धोका देईल हेही सांगणे कठिनच आहे. हलक्या धानाची लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर धान कटाई झाली. मध्यम प्रतिच्या धानाची कटाई जोरात सुरू आहे. जड धानाला आठ दिवस वेळ आहे. अतिदुर्गम तालुक्यामध्ये धान कटाई होवून मळणी सुरू झालेली आहे. आर्थिक परिस्थितीमुळे लाचार झालेला बळीराजा मळणी करून झालेले धान्य घरी ठेवू शकत नाही. लोकांचे देणेघेणे व्यवहार पुर्ण करण्यासाठी खाजगी धान व्यापाऱ्यांना धान्य विकावे लागत आहे. कारण तालुक्यातील कोणतेही आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू झालेच नाहीत.
खरेदी केंद्र सुरु झाले असते तर शेतकऱ्यांना आपले धान खरेदी केंद्रावर विकता आले असते. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळाले असते. बळीराजाना अडीअडचणी दुर करण्यास मदत झाली असती. खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना आपले धान्य व्यापाऱ्यांना विकावे लागत आहे. आधीच पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिथे जिथे पूर होते तिथे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तालुक्यातील बळीराजा धान खरेदी केंद्राची आतुरतेने वाट पाहत आहे. सरकारला आधारभूत खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी कोणती अडचण आहे हे समजत नाहीये परंतु शेतकऱ्यांना शासनाच्या नियोजन अभावाचा फटका बसताना दिसतो. मागील अडीच वर्षांमध्ये शेतकऱ्यांना बोनस मिळत नाही आणि त्यामुळे शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेत असून शासनाने शेतकऱ्यांना बोनस ची घोषणा करावी अशी मागणीही शेतकरी करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here