The गडविश्व
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील नागपूर चक येथे ग्रापं समिती व मुक्तिपथने मंगळवारी संयुक्त कृती करीत देशी दारू विक्रेत्याकडील ६ हजार रुपयांची दारू नष्ट केली .
नागपूर चक येथे काही दिवसांपूर्वी मुक्तिपथ ग्रामपंचायत समिती गठीत करण्यात आली व गावातील अवैध व्यवसाय बंद करण्याचा सर्वानुमते ठराव घेण्यात आला. तशा सूचनाही दारूविक्रेत्यांना देण्यात आल्या होत्या. मात्र, ग्रामपंचायत समितीच्या सूचनेची पायमल्ली करीत गावातील काही मुजोर विक्रेत्यांनी आपला अवैध व्यवसाय सुरूच ठेवला असल्याची माहिती समितीच्या सदस्यांना मिळाली. त्यानुसार अहिंसक कृती करीत दारूविक्रेत्यांना धडा शिकविण्याचा निर्णय घेण्यात आला.
ग्रामपंचायत समिती, गाव संघटन व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरित्या गावातील चार दारूविक्रेत्यांच्या घराची पाहणी केली. यावेळी एका घरी ६ हजार रुपये किमतीचे ७५ नग देशी दारूचे टिल्लू आढळून असता संपूर्ण माल जप्त करण्यात आला. त्यानंतर गावकऱ्यांच्या उपस्थितीत दारूची होळी करण्यात आली. तसेच गावात कोणी अवैधरित्या दारू विक्री करतांना आढळून आल्यास त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येईल, अशीही तंबी देण्यात आली. यावेळी मुक्तीपथ तालुका संघटक आनंद इंगळे उपस्थित होते.