दहावीच्या विद्यार्थ्यांना केवळ इंटरमिजिएटच्या आधारे मिळणार सवलतीचे गुण

328

The गडविश्व
मुंबई : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता सन २०२१-२२ या वर्षी इयत्ता दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या श्रेणीच्या आधारे सवलतीचे गुण देण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली.
सन २०२१-२२ या वर्षी इयत्ता दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना सन २०२०-२१ या वर्षी एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षेला बसता आले नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय फक्त सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापुरता लागू असल्याचे प्रा.गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.
शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळवणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण देण्याबाबतच्या सुधारित कार्यपद्धतीनुसार विद्यार्थी एलिमेंटरी परीक्षा उत्तीर्ण असल्याशिवाय इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षेचे गुण मिळणार नाहीत अशी तरतूद आहे. तथापि, कोविड-१९ चा प्रादुर्भाव व त्यामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे सन २०२०-२१ या वर्षी शासकीय रेखाकला परीक्षांचे आयोजन होऊ शकलेले नव्हते. सन २०२०-२१ मध्ये शासकीय रेखाकला परीक्षा आयोजित न झाल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी मिळू शकलेली नाही. अशा विद्यार्थ्यांनी केवळ इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या श्रेणीच्या आधारे, त्यांना सन २०२१-२२ या वर्षापुरते सवलतीचे गुण देण्यास मान्यता देण्यात आल्याचे मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here