– समितीच्या पुढाकारामुळे आतापर्यंत अनेकांना रक्तपुरवठा
The गडविश्व
गडचिरोली : आज जागतिक रक्तदान दिन. दर वर्षी शास्त्रज्ञ कार्ल लँडस्टाईनच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘जागतिक रक्तदान दिवस ‘साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचे उद्दिष्टये लोकांना रक्तदानासाठी प्रोत्साहित करणे आणि त्याच्याशी संबंधित गैरसमज दूर करणे आहे.
‘स्वयं रक्तदाता जिल्हा समिती’ हि गडचिरोली जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात कार्यरत असून समितीद्वारे आतापर्यंत अनेक रुग्णांना मदत करून रक्तपुरवठा करण्यात आला आहे. अनेक युवक युवती समितीच्या माध्यमातून रक्तदान करण्यास पुढाकार घेत आहेत. त्यामुळे ‘स्वयं रक्तदाता जिल्हा समिती’ हि रुग्णांकरिता नवसंजीवनी ठरत आहे.१४ जून १८६८ रोजी, महान शास्त्रज्ञ कार्ल लँडस्टीनचा जन्म झाला, त्याने मानवी रक्तात एग्ल्युटिनिन च्या अस्तित्वाच्या आधारे रक्त कणांचे ए, बी आणि ओ गटांमध्ये वर्गीकरण केले. या वर्गीकरणाने वैद्यकीय शास्त्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले. या महत्त्वपूर्ण शोधासाठी कार्ल लँडस्टीन यांना १९३० मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले. १९९७ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने १०० टक्के ऐच्छिक रक्तदान सुरू केले.त्यात त्यांनी १२४ प्रमुख देशांचा समावेश करून सर्वाना ऐच्छिक रक्तदान देण्याचे आवाहन केले. या उपक्रमाचा मुख्य उद्धिष्ट होता की कोणत्याही गरजू माणसाला रक्ताची गरज पडल्यास ते त्याला पैसे देऊन विकत घेऊ लागू नये. या उद्दिष्टला सध्या करण्यासाठी आता पर्यंत ४९ देशांनी ऐच्छिक रक्तदान मोहीम राबविले आहेत.
अद्यापही कित्येक लोकांना रक्त विकत मिळतो किंवा सहज मिळतो असा भ्रम आहे परंतु रक्त कोणत्याही कारखान्यात तयार होत नाही त्यामुळे रक्तदानाशिवाय पर्यायच नाही. सर्वाधिक रक्ताची गरज गरोदर स्त्रिया, सिकलसेल रुग्ण, थॅलेसेमिया रुग्ण व इतर शस्त्रक्रियांकरिता रुग्णांना रक्त पुरवठा करण्यासाठी रक्ताची गरज भासते, ‘स्वयं रक्तदाता जिल्हा समिती’ थेट रुग्णांना शारीरिक आणि रुग्णांच्या नातेवाईकांचा मानसिक त्रास दूर व्हावा म्हणून रक्तपुरवठा करण्याकरिता मदत करीत आहे. त्याकरिता ‘स्वयं रक्तदाता जिल्हा समिती’ जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये रक्तदान शिबिर घेऊन ‘जिल्हा रक्तपेढी’ येथे रक्त संकलन करून रक्तसाठा वाढविण्यासाठी आणि संतुलित ठेवण्यासाठी तत्परतेने पुढाकार घेत आहे.
आत्तापर्यंत ‘स्वयं रक्तदाता जिल्हा समिती’ ने ५४ रक्तदान शिबिर घेतलेले आहेत. कोरोनाच्या काळात रक्तदान शिबिर आयोजित करता येत नसल्याने, तात्काळ रक्तदात्यांना जिल्हा रक्तपेढी पर्यंत पाठवून रक्त पुरवठा केला जात होता. तसेच अचानक एखाद्या नेमक्या रक्तगटाचा तुटवडा पडल्यास तात्काळ रक्तदात्यांच्या सवडीच्या वेळेचा अंदाज घेऊन १०-१२ फोन केल्यानंतर रक्तदानासाठी एखाद्या रक्तदात्याचा होकार आल्यावर अर्ध्या तासात रक्तपेढी पर्यंत जाऊ शकणाऱ्या रक्तदात्याला पाठवून रक्त पुरवठा केला जातो.
तथापि, अद्याप भारतासह अनेक देशांमध्ये रक्तदानासाठी पैशाचे व्यवहार केले जातात. परंतु तरीही, रक्तदात्यासंदर्भात विविध संस्था आणि वैयक्तिक पातळीवर उचललेली पावले भारतातील स्वेच्छेने रक्तदानास चालना देण्यासाठी प्रभावी ठरल्या आहेत. वैद्यकीय विज्ञान रक्तदानाच्या संदर्भात म्हणतो की कोणतेही निरोगी व्यक्ती ज्याचे वय १६ ते ६० वर्षांच्या दरम्यान आहे आणि ज्याचे वजन ४५ किलो पेक्षा जास्त आहे आणि ज्याला एचआयव्ही ,हेपेटायटिस बी किंवा हेपेटायटिस सी सारखे आजार झाले नसावे ती रक्तदान करू शकते. निरोगी माणसांनी रक्तदान अवश्य करावे. ”रक्तदान महादान ”.
‘स्वयं रक्तदाता जिल्हा समिती’च्या पुढाकारामुळे अधिकाअधिक पैसे घेऊन रक्तपुरवठा करणाऱ्या लोकांना आळा बसलेला आहे. सर्वाधिक नवीन रक्तदाते तयार करण्याचा संकल्प घेत २०२०, २०२१ आणि २०२२ वर्षांमध्ये नवीन रक्तदाते तयार केले आहे. पहिल्या महिन्यापासून सातव्या महिन्यापर्यंत गरोदर स्त्रियांना रक्ताच्या गरजेसाठी पूर्वनोंदणी करण्याकरिता सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रत्येक रक्तदात्यांना सानुग्रह निधी फॉर्म भरून दिले जात आहे. रक्तदात्यांच्या मागणीनुसार त्यांच्या नातेवाईकांना तात्काळ रक्तपुरवठा केल्या जात आहे. रक्ताची सर्व व्यवस्था फोन कॉल च्या माध्यमातून आणि गुगल लिंक द्वारे सोप्या पद्धतीने होत आहे. एवढेच नाहीतर गडचिरोली जिल्हा अतिदुर्गम, विविध भाषिक, अल्पशिक्षित आणि गोरगरीब लोकांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. जिल्ह्यातील अनेक भागात आजही आरोग्य सुविधा पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध नाही असे असताना ‘स्वयं रक्तदाता जिल्हा समिती’ च्या वतीने दुर्गम भागातील गावांमध्येही रक्तदान शिबिरे आयोजित करून रक्तदानाविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे. अनेकांना समितीच्या माध्यमातून रक्तदानासाठी प्रोत्साहतीत करण्यात येत आहे. या सर्व धावपळीमध्ये स्वयं रक्तदाता जिल्हा समिती अध्यक्ष चारुदत्त राऊत, उपाध्यक्ष निशिकांत नैताम, सचिव मनोज पिपरे, कोषाध्यक्ष आकाश आंबोरकर, सदस्य जयश्रीताई भोयर, स्नेहाताई राऊत आदी पदाधिकारी मेहनत घेत आहेत. त्यामुळे आजही स्वतः रक्तदाते पुढे येऊन रक्तदान करीत आहे.
मानवी शरीराला मानवाचाच रक्त लागतो. आज रक्ताचा तुटवडा पडत आहे. रक्त हे कुठल्याही मशीनद्वारे तयार होत नाही, मानवी शरीरातच त्याची उत्पत्ती होत असते. म्हणून मानवी रक्त हे खूप मौल्यवान आहे. एखाद्यास रक्ताची आवश्यकता असल्यास मानवाने कोणतेही भेद न ठेवता रक्तदान करून एखद्याचा जीव वाचविण्याकरिता मदत करावे. रक्तदान हेच सर्वात श्रेष्ठ दान आहे. रक्तदानाविषयी मनात काही शंका असल्यास अवश्य शंकेचे निराकरण करण्यात येईल. ‘रक्तदान करून एखाद्याचा जीव वाचण्यास मदत करा’ ” रक्तदान श्रेष्ठदान”
-चारुदत्त राऊत , अध्यक्ष ‘स्वयं रक्तदाता जिल्हा समिती’
दोन अनोळखी व्यक्तींना जोडणारा दुवा म्हणजे रक्तदान आणि माणसामध्ये माणुसकी निर्माण करून पुढाकार घ्यावयास लावणारा अविभाज्य घटक म्हणजे रक्तदान. जगामध्ये १४ जून हा दिवस “जागतिक रक्तदान दिवस” म्हणून साजरा केला जातो. आणि साजरा करायला सुद्धा पाहिजे, याची नित्तांत गरज सुद्धा आहे.
आजच्या धावत्या काळात एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा निश्चितच शेवटचा श्वास वाचवू शकतो, तो म्हणजे रक्तदान करून…. आज हजारो रुग्णांसाठी, गरजूंसाठी “स्वयं रक्तदाता समिती” ही ‘नवसंजीवनी’ठरत आहे.
स्वयं रक्तदाता समिती ही गावोगावी रक्तदान शिबिरे घेऊन जिल्हा रक्तपेढीतील रक्तसाठ्यात वाढ करत आहे. तसेच गरजेनुसार वेळोवेळी रक्तदाते पाठवून मोलाची भूमिका वटवत आहे, हे विशेष आहे.
तसेच गरोदर स्त्रियांना रक्तासाठी धावफळ होऊ नये म्हणून गुगल लिंकच्या माध्यमातून पहिल्या महिन्यापासून ते सातव्या महिन्यापर्यंत पूर्वनोंदणीची ( https://forms.gle/Ad1rRTJAfcrEBdB39 ) सोय करण्यात आलेली आहे. तसेच रक्तदात्यांच्या सोयीसाठी सानुग्रह निधी फॉर्म भरून देण्यात येत आहे.
स्वयं रक्तदाता समिती आपल्या परीने पूर्णपणे दिनरात एक करून कार्य करत आहे, यात शंका नाही परंतु मोठया प्रमाणात युवा वर्गाने पुढाकार घेऊन स्वयं रक्तदाता समितीचे सदस्य बनून समितीला सामोरे घेऊन जाण्याची गरज आहे.
तसेच इच्छुक दात्यांना स्वैछ्चिक रक्तदान करावयास असल्यास खालील लिंक भरून स्वयं रक्तदाता समितीला सहकार्य करावे. जेवणेकरून जेव्हा केव्हा गरजूंना रक्ताची किंवा विशेष रक्ताची मदत लागेल तेव्हा आम्ही तुमच्यासोबत संपर्क करून गरजूची मदत भरून काढू शकतो.
https://forms.gle/KDNdX2x4x6EFDYA49
माणूस माणसाला फक्त रक्तदान करून वाचवू शकतो…! Save The Last Breath म्हणून रक्तदान श्रेष्ठदान!