गडचिरोली : तब्बल ४०३ गोवंश तस्करीचा डाव उधळला

849

– १४ ट्रकसह मुद्देमाल जप्त, सहा जणांवर गुन्हा दाखल
The गडविश्व
गडचिरोली, १९ ऑगस्ट : दोन वेगवेगळ्या कारवाईत १४ ट्रकमधून गोवंशांची तस्करी करण्याचा डाव उधळून लावत तब्बल ४०३ गोवंश जनावरांची मुक्तता करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे.
पुराडा ते कुरखेडा मार्गे गोवंश तस्कर १० ते १२ ट्रकमध्ये जनावरे कोंबुन कत्तलीसाठी नेत असल्याबाबतची माहिती कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी साहील झरकर यांना मिळाली. गुप्त माहितीनुसार काल १८ ऑगस्ट रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व पोलीस स्टेशन कुरखेडा येथील पथकाने कुरखेडा जवळील गोठणगाव फाटा येथे नाकाबंदी करून सापळा रचला. दरम्यान कत्तलीसाठी वाहतुक करणारे ९ ट्रक पकडून २७८ गोवंश जनावरांची मुक्तता केली.दुस­ऱ्या घटनेत आज १९ जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास कत्तलीसाठी जनावरे ट्रकमध्ये कोंबुन बोटेझरी मार्गे येत असल्याबाबत पेंढरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मयुर भुजबळ यांना मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार गट्टा (फु.) मार्गांवर नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी कत्तलीसाठी वाहतुक करणारे ५ ट्रक फुलबोडी येथे पकडून एकुण १२५ गोवंश जनावरांची मुक्तता करण्यात आली आहे. सदर दोन्ही कारवाईमध्ये गोवंश वाहतुक करणा­ऱ्या ६ आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करून कारवाई सुरू आहे. दोन्ही घटनेत एकुण १४ ट्रक मुद्देमालासह जप्त करण्यात आले असून, एकुण ४०३ गोवंश जनावरांची मुक्तता करण्यात आली आहे. पुढील तपास गडचिरोली पोलीस दल करीत आहे.
सदर घटनेत कुरखेडा येथील कारवाई करीता कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा साहील झरकर तसेच सपोनि दिनेश गावंडे, अंमलदार राकेश पालकृतीवार, नरेश अत्यालगडे, जितेंद्र कोवाची, मनोज राऊत, रूपेश काळबांधे व पेंढरी येथील कारवाई करीता उपविभागीय पोलीस अधिकारी पेंढरी मयुर भुजबळ, पोउपनि गजानन सोनुने, नापोशि/विलास कुमरे, नापोशि/संदीप बागळे, पोशि/नितेश कढव, पोशि/शरद जाधव यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here