– पुरोगामी विद्यार्थी व युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर यांचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली : गडचिरोली शहरासह जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षण विभागाचे नियम धाब्यावर बसवून मनमानी कारभार करीत असून शालेय शुल्क, टि.सी., नवीन प्रवेश, शालेय निकाल पत्र न देणे असे प्रकार करीत आहेत. याविरोधात आता शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी विद्यार्थी व युवक संघटनेद्वारा कायदेशीर लढा उभारण्यात येत असून पिडीत विद्यार्थ्यांच्या पालकांनी शेतकरी कामगार पक्षाचे कार्यालय आणि पुरोगामी विद्यार्थी व युवक संघटनेकडे तक्रारी कराव्यात असे आवाहन पुरोगामी विद्यार्थी व युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर यांनी केले आहे.
भाई अक्षय कोसनकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गडचिरोली शहरातील इंग्रजी माध्यमाच्या अनेक शाळांना कायदे धाब्यावर बसवून मान्यता दिली गेली आहे. आता याच बेकायदेशीर शाळांचे व्यवस्थापन विद्यार्थी आणि पालकांना लाॅकडावून काळातील शालेय शुल्क बळजबरीने आकारुन आर्थिक छळवणूक करीत आहेत. स्वतः ला अल्पसंख्याक म्हणून घेणाऱ्या एका शाळेने तर मनमानी कारभाराची परिसीमा गाठली असून ऑनलाईन किंवा इतर कोणत्याही वर्गांना शिक्षण न देताही बळजबरीने शुल्क भरण्यास पालकांशी हुज्जतबाजीने व्यवहार करीत आहे. तसेच टि.सी.सुध्दा देण्यासाठी भरमसाठ शुल्क आकारण्याचा सपाटा लावला आहे.
या बाबत राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सुस्पष्ट आदेश जारी करुनही खासगी शाळांची मनमानी थांबली नसून या शाळांच्या विरोधात आता पुरोगामी विद्यार्थी व युवक संघटनेद्वारा लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून जिल्ह्यातील कोणत्याही खासगी शाळांच्या मनमानी कारभाराबाबत विद्यार्थी आणि पालकांना तक्रारी करायच्या असल्यास शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात 07132295399 व 9623975291 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहनही भाई अक्षय कोसनकर यांनी केले आहे.