खळबळजनक : गोळी झाडून अस्वलाची शिकार

617

– अज्ञात शिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल, शिकाऱ्यांचा शोध सुरू

The गडविश्व
गोंदिया : बंदुकीने गोळी झाडून अस्वलाची शिकार केल्याची घटना नवेगाव बांध अंतर्गत येत असलेल्या सहवनक्षेत्र बाराभाटी चान्ना बिट इंजोरी परिसरात रविवार १३ मार्च रोजी उघडकीस आली. या प्रकरणी अज्ञात शिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करून शिकाऱ्यांचा शोध घेणे सुरू असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे वनविभागात खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील चान्ना बिटअंतर्गत येणाऱ्या इंजोरी येथील शेतकरी होमराज धनीराम शेंडे त्यांच्या शेतात अस्वलाची शिकार झाल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. माहितीच्या आधारे वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी शेतात जाऊन मोका तपासणी केली. यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून अस्वलाचे शवविच्छेदन केले. शवविच्छेदन अहवालात अस्वलाची शिकार ही बंदुकीची गोळी झाडून केल्याची बाब पुढे आली. घटना स्थळावर अस्वलाचे पंजे, कातडे व मांस आढळले. याप्रकरणी अज्ञात शिकाऱ्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९,४४,४८, अन्वये वनगुन्हा दाखल करण्यात आला असून शिकाऱ्याच्या शोध घेणे सुरू आहे. नवेगाव बांध वनपरिक्षेत्रात मागील काही दिवसांपासून वन्य प्राण्यांची शिकार वीज प्रवाहाने केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यानंतर बंदुकीच्या गोळीने अस्वलाची शिकार करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी डी. व्ही. राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी आर. आय. दोनोडे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here