इंदिरा गांधी विद्यालय पालेबारसा शाळेला मॅजिक बस इंडिया फाऊंडेशनच्या दिल्ली कार्यलयातील अधीकाऱ्यांची भेट

207

– मॅजिक बसच्या माध्यमातून चालणाऱ्या उपक्रमाची केली पाहणी
The गडविश्व
सावली, १९ सप्टेंबर : तालुक्यातील इंदिरा गांधी विद्यालय पालेबारसा शाळेला मॅजिक बस इंडिया फाऊंडेशनच्या दिल्ली कार्यलयातील अधीकाऱ्यांनी भेट देऊन मॅजिक बसच्या माध्यमातून चालणाऱ्या उपक्रमाची पाहणी केली.
मॅजिक बस इंडिया फाउंडेशन, चंद्रपूर संस्थेचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात व तालुका समन्वयक आकाश गेडाम यांच्या नियंत्रणात सावली तालुक्यातील ३७ शाळांमध्ये वर्ग ६ ते ९ पर्यंतच्या ३८४३ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी (SCALE) “खेळा द्वारे शिक्षण/जीवन कौशल्य विकास” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सदर उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संवाद कौशल्य, गटकार्य, समस्यांचे निराकरण, शिकण्यासाठी शिकणे, स्व-व्यवस्थापन इत्यादी जीवण कौशल्यांचे धडे दिले जातात तसेच शिक्षणाचे महत्व आणि लिंग समानता याबद्दल देखील सत्राच्या माध्यमातून मार्गदर्शन केल्या जात आहे.
मॅजिक बसचा उपक्रम इंदिरा गांधी विद्यालय पालेबारसा येथे मागील सहा महिन्या पासून राबविला जात असल्याने सदर उपक्रमाची पाहणी करण्याकरीता मॅजिक बस संस्थेच्या दिल्ली येथील मुख्य कार्यालयातील गीतांजली दास व झोया मॅडम यांनी भेट दिली. भेट देण्यामागील मुख्य प्रयोजन म्हणजे पालेबारसा शाळेत व गावात राबविण्यात येत असणाऱ्या SCALE कार्यक्रमा बाबत शाळा व गावाचे मत जाणून घेणे आणि उपक्रम अधिक यशस्वीरीत्या राबविला जाण्यासाठी योजना तयार करणे. यावेळी मॅजिक बस इंडिया फाउंडेशनचे वरीष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे तसेच सावलीचे तालुका समन्वयक आकाश गेडाम प्रामुख्याने उपस्थित होते.
दिल्ली वरून आलेल्या पाहुण्यांच पालेबारसाच्या सरपंचा मंदाताई मडावी व इंदिरा गांधी विद्यालय पालेबारसा चे मुख्याध्यापक लोखंडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यांनतर शाळा सहाय्यक अधिकारी कु. श्रध्दा नागमोते यांनी पालक सत्र घेऊन पालकांना उच्च शिक्षणाचे महत्व सांगितले. गीतांजली दास यांनी पालकांशी चर्चा केली व उपक्रमा बाबत पालकांचे मत जाणून घेतले.
पालकांशी चर्चा झाल्या नंतर मॅजिक बस संस्थेच्या अधिकाऱ्यांनी शाळेचे मुख्याध्यापक , सर्व शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य व गावातील पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिकांशी चर्चा केली व मॅजिक बस उपक्रमा बाबत गावकऱ्यांचे मत जाणून घेतले. चर्चे अंती मॅजिक बस उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे व हा उपक्रम आमच्या शाळेत व गावात सतत सुरू असावा अशी अपेक्षा गावकऱ्यांनी व्यक्त केली.
सदर चर्चेला सरपंचा मंदाताई मडावी, उपसरपंच सुरेश खेडेकर, मुख्याध्यापक लोखंडे, तसेच विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद व गावातील प्रतिष्ठित नागरिक व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रम शाळा सहायक अधिकारी कु. श्रद्धा नागमोते, मंगेश रामटेके, सौ. निशा उमर्गुंडावार व समुदाय समन्वयक कु. विश्रांती पेंदाम व सौ. रीना चीमुरकार यांच्या अथक परिश्रमाने यशस्वीरित्या पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here