अवैध व्यवसायावर आळा न बसल्यास शेकडो महिला करणार धरणे आंदोलन

100

– देसाईगंज तालुका संघटनेचा इशारा
The गडविश्व
गडचिरोली, १४ नोव्हेंबर : देसाईगंज तालुक्यातील मोठ्या अवैध व्यवसायिकांवर तडीपार प्रस्ताव प्रस्तावित करून उचित कार्यवाही करण्यात यावी तसेच महिनाभरात तालुक्यातील अवैध दारूवर आळा न बसल्यास शेकडो महिला पोलिस स्टेशन पुढे धरणे आंदोलन करणार, असा इशारा तालुका संघटनेच्या महिलांनी पोलिस निरीक्षक यांना सादर केलेल्या निवेदनातून दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, रक्षाबंधन कार्यक्रमात ओवाळणी मध्ये तालुक्यातील सर्व गावे आणि वार्डा मधील अवैध व्यवसायांवर आळा बसावा ही ओवाळणी मागण्यात आली होती. परंतु सद्य स्थितीत अवैध व्यवसायांत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यासाठी ११ ऑगस्ट २०२२ ला पहिले निवेदन देण्यात आले आणि दुसरे निवेदन १० ऑक्टोबर  ला देण्यात आले. या कालावधील पोलिस विभागाने कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याने ११ नोव्हेंबर २०२२ ला शनिवारी पुन्हा तिसरे निवेदन सादर करण्यात आले. अवैध व्यवसाय सुरूच असल्याने  दारूमुळे अनेक आजार, अपघात इत्यादिमध्ये वाढ झाली असून लहान युवा पिढी दारूच्या आहारी जात असून त्याचा नाहक त्रास महिलांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे तालुक्यातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता उचित कार्यवाही करून तसा अहवाल तालुका संघटना अध्यक्ष यांना सादर करावा, असेही निवेदनात नमुद केले आहे.

तालुक्यातील मोठे दारू किंग, सट्टा-जुगार व्यावसायिक यांच्यावर आळा बसण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी आणि नवीन तडीपार प्रस्ताव प्रस्तावित करण्यात यावे. तसेच निवेदन सादर केल्यापासून महिनाभराच्या कालावधीत अवैध व्यवसायांवर आळा न घातल्यास शेकडो महिला पोलिस स्टेशन प्रांगणात १५ डिसेंबरला २०२२ ला धरणे आंदोलणाकरिता बसतील, असाही इशारा पोलिस विभागाला देण्यात आला आहे. निवेदन सादर करताना तालुका संघटनेच्या महिला उपस्थित होत्या.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here