द गडविश्व
वृत्तसंस्था / मुंबई : महाराष्ट्रात कोरोना आणि ओमायक्रोनबाधितांचा आकडा वाढत असताना एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. भाजप आमदार समीर मेघे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती नुकतीच समोर आली होती. मेघे यांनी फेसबुकवर याबाबतची माहिती दिली होती. विशेष म्हणजे समीर मेघे राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सहभागी झाले होते. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. मेघे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून शनिवारी (25 डिसेंबर) 1500 जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. त्यापैकी तब्बल 32 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये कोणत्याही लोकप्रतिनिधीचा समावेश नाही, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला 22 डिसेंबरला सुरुवात झाली होती. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्व आमदारांसह कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली गेली होती. सर्व गोष्टींची खबरदारी घेण्यात आली होती. पण अखेर ज्या गोष्टीची भीती होती तीच घटना अखेर घडली आहे. अधिवेशनात अखेर कोरोनाचा शिरकाव झाला आहे. अधिवेशनासाठी काम करणाऱ्या 32 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 32 कोरोनाबाधितांमध्ये पोलीस कर्मचारी, काही मंत्रालय कर्मचारी तसेच विधानभवनातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
खरंतर हिवाळी अधिवेशन दोन आठवड्यांमध्ये होतं. पहिल्या आठवड्यात तीन दिवस आणि येणाऱ्या आठवड्यात दोन दिवस, असा कालावधी अधिवेशनासाठी निश्चित करण्यात आलेला होता. दोन्ही आठवड्याच्या सुरुवातीला कोरोनाची चाचणी बंधनकारक आहे. त्याच पार्श्वभूमीवर अधिवेशनाला येणारे सर्व आमदार, मंत्री, सरकारी कर्मचारी, पोलीस, पोलीस अधिकारी आणि पत्रकार या सर्वांची कोरोना चाचणी दोन्ही आठवड्यात केली गेली. दोन दिवसात या चाचण्या घेण्यात आल्या. त्यामध्ये 32 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यामध्ये काही पोलीस, सरकारी कर्मचारी आणि काही पत्रकारांचा समावेश आहे. पण एकाही आमदाराला कोरोनाची लागण झाल्याची माहिती सध्यातरी समोर आलेली नाही. आज रात्री उशिरापर्यंत आणखी अनेकजणांचे रिपोर्ट येणार आहेत.