– हजारोंच्या संख्येने नागरिक जिल्हामुख्यालयी दाखल , सातशे च्या जवळपास चारचाकी वाहने
The गडविश्व
गडचिरोली, ९ ऑक्टोबर : कोरची तालुक्यातील झेंडपार येथील प्रस्तावित लोहखाणीकरिता उद्या १० ऑक्टोबर रोजी पर्यावरण विषयक जनसुनावणी आयोजित केलेली असून या जनसूनवणीकरीता कोरची तालुक्यातील हजारोंच्या संख्येने नागरिक जिल्हा मुख्यालयी आज ९ ऑक्टोबर रोजीच दाखल झाले असुन जिल्हा मुख्यालयी विविध चर्चेला पेव फुटले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील झेंडपारसह इतर लोहखाणी प्रस्तावित असून कोरची तालुक्यातील झेंडपार येथील प्रस्तावित लोहखाणीकरिता झेंडपार परिसर व कोरची तालुक्यातील नागरिकांचा विरोध दिसून येतो मात्र असे असतांनाही पर्यावरण विषयक सुनावणी उद्या १० ऑक्टोबर रोजी आयोजित केली असून हजारोंच्या संख्येने कोरची तालुक्यातील नागरिक जिल्हा मुख्यालयी दाखल झाले आहेत. १० तारखेला कोरची परिसरात या जनसूनवणीचा विरोध दर्शविण्याकरिता चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याने आजच सोमवारी परिसरातील नागरिकांना जिल्हा मुख्यालयी खासगी वाहनांद्वारे आणण्यात आले आहे अशी सुत्रांद्वारे माहिती प्राप्त झाली आहे.
नागरिकांच्या राहण्याची जेवणाची सोय
जिल्हा मुख्यालयातील तीन चार सभागृह, हॉल मध्ये नागरिकांच्या राहण्याची व जेवणाची सोयही करण्यात आली असून नागरिक जिल्हा मुख्यालयाच्या रस्त्यावरही आढळून आले. जवळपास सातशे (७००) खासगी वाहने असल्याचीही माहिती असून हॉल, सभागृहाना प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात नागरिक व खासगी वाहने दिसून आल्यात.
कोणाचा विरोध तर कोणाचे समर्थन
या जनसुनवणीकरिता आलेल्या काही नागरिकांची भेट घेतली असता नागरिकांमधील कोणाचा विरोध तर कोणाचे समर्थन दिसून आले. तसेच या जनसुनावणीकरिता आलेल्या नागरिकांना गावात प्रत्यक्ष वाहन पाठवून या ठिकाणी आणण्यात आल्याची माहिती आहे. तर या नागरिकांना दोन दिवसांची रोजीही देण्यात येणार आहे अशीही माहिती सुत्रांद्वारे प्राप्त झाली. काही गावांमध्ये ५ ते ६ च्या संख्येत तर काही गावामध्ये १२-१५ खासगी वाहने पाठवून नागरिकांना जिल्हामुख्यालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच या नागरिकांना येथे आणण्याची जबाबदारी कुठल्या व्यक्तीने घेतली हे मात्र कळले नसून काही कंत्राटदारांनी यांची पूर्ण व्यवस्था केली असल्याची चर्चा नागरिकांमध्ये दबक्या आवाजात ऐकू आली. त्यामुळे एकूणच ही सुनावणी आहे कोणासाठी हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.
विविध पक्ष आणि संघटनांनी नोंदविला आक्षेप
पारंपरिक पद्धतीने वहिवाटीसह आपल्या उपजीविकांसाठी नैसर्गिक संसाधनावर अवलंबून असल्यामुळे पर्यावरण संरक्षण व संवर्धन करण्याकरिता महत्वाचे स्वामित्व हक्क, आदिवासी व इतर पारंपरिक वननिवासीना प्राप्त झाले आहेत. त्यामुळे कायद्या प्रमाणे सदर वनातील उपजीविका करीता गौण उपज गोळा करणे, व पारंपरिक पद्धतीने वन संरक्षण आणि संवर्धन व व्यवस्थापन करण्याचे पूर्ण अधिकार वन निवासी व ईतर पारंपारिक वन निवासींना प्राप्त झालेला आहे. असे असतांना वनहक्क, पेसा आणि जैवविविधता अशा विविध कायद्यांना धाब्यावर बसवून बळजबरीने खाणी खोदू नका या मागणीसह आज शेवटच्या दिवशी जिल्ह्यातील शेकाप,भाकप,माकप, अभारिप,बिआरएसपी सह विविध पक्ष आणि संघटनांनी इ मेल द्वारे आक्षेप नोंदविले आहे.
एकूणच बघता या जनसुनवणीकरिता पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात करण्यात येणार असल्याचे सुत्रांद्वारे कळते. जनसुवनावणीत काय निकाल लागतो कोणाचं पारडे जड होते हे पाहणे आवश्यक असून याकडे संपूर्ण जिल्हा वासीयांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा : झेंडेपार लोह खाणींची जनसुनावणी अन्यायकारक
(the gdv, the gadvishva, gadchiroli, jhendepaar, zhendepaar, korchi, gadchiroli news)