– विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या उपक्रमांनी दिला “वन वाचवा – जीवन वाचवा”चा संदेश
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा ( चेतन गहाणे) दि. ०९ : देशभरात दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘वन्यजीव सप्ताह’ १ ते ७ ऑक्टोबरदरम्यान उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने कुरखेडा वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने सलग सात दिवस विविध उपक्रमांचे आयोजन करून जनतेत पर्यावरण व वन्यजीव संरक्षणाबाबत जागृती घडविण्यात आली.
या उपक्रमांची सुरुवात १ ऑक्टोबर रोजी कुरखेडा शहरातून निघालेल्या भव्य बाईक रॅलीने झाली. “वन्यजीव वाचवा, निसर्ग वाचवा” असा घोष देत नागरिक व विद्यार्थ्यांनी या रॅलीत उत्स्फूर्त सहभाग घेतला. २ ऑक्टोबरला गांधी आणि शास्त्री जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान राबवून स्वच्छ पर्यावरणाचा संदेश देण्यात आला.
३ ऑक्टोबरला वनराई बंधारा बांधणी करून जलसंधारणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले, तर ४ ऑक्टोबरला विविध शाळांमध्ये निबंध आणि चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी सर्जनशीलतेतून वनसंवर्धनाचे संदेश प्रभावीपणे मांडले.
५ ऑक्टोबरला जंगल भ्रमंती आणि जनजागृती मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला, ज्यात वन्यजीवांचे पर्यावरणातील स्थान स्पष्ट करण्यात आले. ६ ऑक्टोबर रोजी श्रीराम विद्यालयात वन्यजीव विषयावर व्याख्यान घेण्यात आले. आठवड्याचा समारोप ७ ऑक्टोबर रोजी कुरखेडा शहरात काढलेल्या वृक्ष दिंडी (भजन) व जनजागृती रॅलीने झाला, ज्यात नागरिकांनी हिरवळ टिकवण्याचा संकल्प केला.
या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन वनपरिक्षेत्र अधिकारी लक्ष्मीकांत गोपूलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या यशस्वीतेत क्षेत्र सहाय्यक संजय कंकलवार, आर.एन. राऊत, बाबूराव तूलावी, डोंगरे, तसेच वनरक्षक गोन्नाडे, दूधबळे, सपना वालदे, काशीवार, आरेवार, टीकरे, मेश्राम, कुमारे, गावडे, हातमोडे, सयाम, मूडमडीगेला, हलामी, पोरेटी, साठवणे यांचे मोलाचे योगदान राहिले.
वनमजूर आणि कर्मचारी वर्गाच्या सक्रिय सहभागामुळे संपूर्ण आठवडा निसर्गसंवर्धनाच्या संदेशाने उजळला.
कुरखेड्यातून निघालेला हा “वन वाचवा – जीवन वाचवा”चा संदेश आता सर्वांच्या मनात रुजतो आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #KurKheda #WildlifeWeek #ForestDepartment #EnvironmentAwareness #SaveNature #SaveWildlife #EcoProtection #GreenMission #WildlifeConservation #ForestConservation #NatureLovers #Gadchiroli #SustainableFuture #EcoFriendly #CleanAndGreen #SaveForests #EnvironmentalEducation #WildlifeProtection #EcoAwareness #OneEarth














