आदिवासी बांधवांच्या मदतीनेच माओवाद संपवू : पोलीस महासंचालक श्रीमती रश्मि शुक्ला

1116

– गडचिरोली च्या अतिसंवेदनशिल पोस्टे वांगेतुरी व पोमकें गर्देवाडा येथे भेट
The गडविश्व
गडचिरोली, दि.१७ : शिक्षणाच्या जोरावर आदिवासी समाजातील महिला या देशाच्या राष्ट्रपती पदी देखील येऊ शकतात. आजपर्यंत माओवाद्यांच्या प्रभावामुळे हा परिसर विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिला होता. परंतू आता नवीन पोलीस मदत केंद्राच्या स्थापनेमुळे येथील नागरिक भयमुक्त होऊन विकासाच्या प्रवाहात येतील. पोलीस दादालोरा खिडकी सारख्या उपक्रमातून दुर्गम भागातील आदिवासी बांधवांना विविध शासकिय योजनांचा लाभ मिळत आहे. त्यामुळे येत्या काळात येथील आदिवासी बांधवांच्या मदतीनेच आम्ही माओवाद संपवू तसेच गडचिरोली जिल्हयाच्या विकासासाठी शासन कटिबध्द असुन, जनतेने माओवाद्यांच्या भुलथापांना बळी पडु नये असे प्रतिपादन पोलीस महासंचालक श्रीमती रश्मि शुक्ला यांनी केले. ते आज गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर होत्या. अतिसंवेदनशिल पोस्टे वांगेतुरी व पोमकें गर्देवाडा येथे भेट दिली यावेळी नागरिकांशी संवाद साधतांना बोलत होत्या.
आज १७ फेब्रुवारी रोजी पोलीस महासंचालक श्रीमती रश्मि शुक्ला यांनी गडचिरोली पोलीस दलास भेट दिली. यावेळी पोलीस महासंचालक यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली येथील शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करुन शहीद जवानांना श्रद्धांजली वाहीली व शौर्यस्थळास भेट दिली. त्यानंतर नोव्हेंबर २०२३ मध्ये नव्याने स्थापन झालेल्या पोस्टे वांगेतुरी येथे भेट देऊन पोस्टे वांगेतुरी येथील कामकाजाची पाहणी केली व उपस्थित अधिकारी व अंमलदार यांच्याशी संवाद साधला.
त्यानंतर जानेवारी २०२४ मध्ये उपविभाग हेडरी अंतर्गत नव्याने स्थापन झालेल्या पोमकें गर्देवाडा येथे पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन आयोजित केलेल्या महाजनजागरण मेळाव्यात पोलीस महासंचालक यांचे हस्ते व आयुक्त,राज्य गुप्तवार्ता विभाग,म.रा. मुंबई शिरीष जैन, विशेष पोलीस महानिरीक्षक, नक्षलविरोधी अभियान नागपूर संदिप पाटील,पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत महाजनजागरण मेळाव्यात हजर नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड, आभा कार्ड, ई-श्रम कार्ड व इतर शासकिय कागदपत्रे, स्प्रे पंप, स्वयंपाकासाठी लागणारी मोठी भांडी, मच्छरदानी, ब्लॅकेट, लोवर-टीशर्ट, मोठे बल्ब, महिलांना साड्या व चप्पल, तसेच शालेय विद्यार्थ्यांना सायकल, पेन, नोटबुक, क्रिकेट किट, व्हॉलीबॉल व नेट, कपडे, कंपॉस, चॉकलेट, बिस्कीट इ. साहित्यांचे वाटप करण्यात आले.
त्यानंतर पोलीस महासंचालक साो. यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पोमकें सुरजागड येथील पोलीस अंमलदार निवासस्थानाचे व पोलीस अंमलदार भोजन कक्षाचा उदघाटन समारंभ पार पाडला. त्यानंतर पोलीस महासंचालक यांनी उपमुख्यालय प्राणहिता येथे भेट देऊन सर्व पोलीस अधिकारी/अंमलदार यांचा दरबार घेऊन उपस्थित सर्व अधिकारी/अंमलदार यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी सांगितले की, त्यांना गडचिरोली पोलीस दलाच्या सी-60 पथकाचा अभिमान असून, सी-60 पथकातील जवानांनी माओवादाविरुद्धच्या शिल्लक असलेल्या शेवटच्या लढाईवर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. त्यानंतर पोलीस महासंचालक व इतर मान्यवर यांनी सी.टी.सी. किटाळी येथे भेट दिली व त्यांच्या हस्ते सी.टी.सी. किटाळी येथील प्रशिक्षणार्थी बॅरेक, टॅक्टीकल फायरिंग रेंज कंट्रोल रुम व फायरबट क्र. 01 चे नुतनीकरण उद्घाटन समारंभ पार पाडला. उद्घाटनानंतर पोलीस महासंचालक यांनी बिडीडीएस (बॉम्ब शोधक व नाशक पथक) सह माओवादविरोधी अभियानामध्ये गडचिरोली पोलीस दलाकडुन वापरलेल्या शस्त्रास्त्रे, ड्रोन व विविध प्रकारच्या युद्धनिती बाबत प्रात्यक्षिकाद्वारे माहिती घेतली.
दिवसभर चाललेल्या या सर्व कार्यक्रमांमध्ये आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, म.रा. मुंबई शिरीष जैन सा., विशेष पोलीस महानिरीक्षक, नक्षलविरोधी अभियान नागपूर, संदिप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख , अपर पोलीस अधीक्षक, अहेरी एम. रमेश सा. हे उपस्थित होते.

(#thegdv, the gadvishva, gadchiroli news, rashmi shukla, gadchiroli police)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here