– ‘भ्रष्टाचाराला नाही म्हणा, राष्ट्रासाठी वचनबध्द व्हा,
The गडविश्व
गडचिरोली, दि. ३१ : भ्रष्टाचारमुक्त भारत – विकसीत भारत ही संकल्पना घेवून ३० ऑक्टोबर पासून दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर सप्ताहाच्या अनुषंगाने, ॲन्टी करप्शन ब्युरो, गडचिरोली येथील कार्यालयात भ्रष्टाचार निर्मूलन शपथ कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
हा दक्षता जनजागृती सप्ताह ०५ नोव्हेंबर पर्यंत चालणार असून ॲन्टी करप्शन ब्युरो गडचिरोली कार्यालयाचे वतीने “भ्रष्टाचाराला नाही म्हणा, राष्ट्रासाठी वचनबध्द व्हा,” ही संकल्पना घेवून विविध उपक्रम व कार्यक्रमाचे आयोजन करुन सर्वसामान्य नागरीकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. शासकीय लोकसेवक व त्यांच्या कुटुंबियांकरीता भ्रष्टाचार निर्मुलना संदर्भात चर्चासत्रे, व्याख्यान, कार्यशाळा तसेच विविध स्पर्धात्मक कार्यक्रमाचे
उदा. मॅरेथान व पथनाटयाचे आयोजन केले जाणार आहे. तसेच शहरी व तालुका क्षेत्रात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे घोषवाक्ये असलेले पत्रके, भिंती पत्रके, बॅनर व पोस्टर वितरीत करुन भ्रष्टाचार विरोधात जनजागृती करण्यात येईल. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात जनजागृती सप्ताहाच्या निमीत्याने ग्रामसभेचे आयोजन करुन वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी यांचे भ्रष्टाचार जनजागृती संबंधी व्याख्यान ठेवण्यात आले आहे.
सप्ताह दरम्यान सर्व शासकीय कार्यालयात काम करणारे शासकीय अधिकारी, कर्मचारी, जिल्हा परीषद, नगर परीषद, नगर पंचायत, ग्रामपंचायतमध्ये निवडून आलेले लोकप्रतिनिधी आणि शासकीय मानधन घेणाऱ्या सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, कर्मचारी व इतर लोकसेवकांच्या भ्रष्टाचारासंबंधी आणि त्यांनी अवैध मार्गाने जमविलेल्या मालमत्तेबाबत काही माहिती असल्यास तसेच एखादया कामाकरीता एखादी व्यक्ती गैरमार्गाने पैशाची मागणी करीत असल्यास नागरीकांना टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क करावे. तसेच कार्यालय पोलीस उपअधिक्षक, ॲन्टी करप्शन ब्युरो गडचिरोली येथील दूरध्वनी क्रमांक ०७१३२ / २९५०२० वर कळवावे किंवा प्रत्यक्ष कार्यालयात येवून तकार करावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले यांनी केले आहे.
दक्षता जनजागृती सप्ताहाच्या प्रारंभी स्थानिक इंदिरा गांधी चौक, टी-पाईंट गडचिरोली व ग्रामपंचायत कार्यालय नवेगाव ता.जि. गडचिरोली या ठिकाणी भ्रष्टाचार विरोधी बॅनर लावून जनजागृती करण्यात आली. तसेच स्थानिक सर्व कार्यालयात पोस्टर चिटकवून व नागरीकांना पत्रके वितरीत करुन जनजागृती करण्यात आली. ॲन्टी करप्शन ब्युरो, गडचिरोली कार्यालयात घेण्यात आलेल्या शपथ विधी कार्यक्रमास पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले, पोनि. शिवाजी राठोड, सफी सुनील पेददीवार, पोहवा नथ्थु धोटे, पोहवा राजु पदमगिरीवार, पोना स्वप्निल बांबोळे, किशोर जौंजाळकर, पोशि किशोर ठाकुर, संदीप उडान, संदीप घोरमोडे, पोशि विद्या म्हशाखेत्री, ज्योत्सना वसाके, चापोना प्रफुल डोर्लीकर इत्यादी उपस्थित होते.














